‘कबुल है’चा लेखक-दिग्दर्शक ओंकार भोजनेचे मत

अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस

‘सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांतावर आधारित एकांकिका सादर करण्यासाठी त्याच तोडीचे व्यासपीठ हवे होते. गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सुरू झाली आणि त्या संकल्पनेला साजेसे दर्जेदार व्यासपीठ मिळाले. एकांकिका नावाजली गेली आणि लेखनासह द्वितीय पारितोषिकही मिळाले. यंदाही आम्ही या स्पध्रेत ईष्रेने सहभागी होत असून अर्जही दाखल केला आहे. तालमी सुरू झाल्या असून आमच्या चिपळूणच्या ‘डीबीजे महाविद्यालय’ची एकांकिका मुंबईत महाअंतिम फेरीत घेऊन यायची आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ने पहिल्याच वर्षी आपल्या अनोख्या स्वरूपाने राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणांचा विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक केंद्रावरील नाटय़वेडय़ा तरुणांचा उत्साह वाढवण्याचे काम या स्पध्रेने केले आहे. त्यामुळे इतर स्पर्धामध्ये सहभागी व्हा, पण ‘लोकसत्ता लोकांकिका’ चुकवू नकाच, असे आमच्या महाविद्यालयानेही सांगितले आहे.’ गेल्या वर्षी अभिनयासह लेखनाचे पारितोषिक पटकावणाऱ्या डीबीजे महाविद्यालय, चिपळूणच्या ओंकार भोजनेची प्रतिक्रिया ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वेगळेपण अधोरेखित करते.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने २९ सप्टेंबरपासून राज्यभरात सुरू होत आहे. या स्पध्रेला टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र आणि प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम यांचे सहकार्य लाभले आहे.
त्याचप्रमाणे या स्पध्रेतील गुणवंत कलाकारांना विविध मालिका व चित्रपटांचे कोंदण देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’चे प्रतिनिधी प्राथमिक फेरीसाठी सर्व केंद्रांवर हजर असतील. तसेच नॉलेज पार्टनर म्हणून यंदा ‘स्टडी सर्कल’ काम पाहणार आहे.

गेल्या वर्षी लोकसत्ता लोकांकिका या स्पध्रेत २००हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यंदा या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर म्हणजे आज असून त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या स्पध्रेची प्राथमिक फेरी २९ सप्टेंबरपासून राज्यभरात सुरू होणार असून महाअंतिम फेरी १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका या स्पध्रेचे अर्ज, माहिती आणि नियम व अटी यांसाठी indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015 या संकेतस्थळाला भेट द्यावी.