१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला मुख्य दोषी मुस्तफा डोसा याचा बुधवारी दुपारी रुग्णालयात उपचार सुरू असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डोसाला मंगळवारी रात्री उशीरा जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप आल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचवेळी अचानक छातीत दुखू लागल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. तापाने फणफणलेल्या डोसाने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंगाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयात हलवले.

जे. जे. रूग्णालयातील जेल वॉर्डात त्याच्यावर मंगळवारी रात्रीपासून उपचार सुरु होते. हायपरटेन्शन आणि वाढलेल्या मधुमेहाच्या त्रासावरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली होती. मुस्तफाच्या छातीतही संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांनी मुस्तफा आणि फिरोजची बॉम्बस्फोटातील भूमिका स्पष्ट करत त्यांना कठोरात कठोर मृत्यूदंडाची अर्थात फाशीच्या शिक्षेची मागणी विशेष टाडा न्यायालयात केली होती.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुस्तफा डोसाचा गुन्हा याकूब मेननपेक्षा अधिक गंभीर होता. त्यामुळेच मुस्तफाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेननला याआधीच फाशी देण्यात आलेली आहे. ‘मुस्तफा डोसा १९९३ च्या बॉम्बस्फोट कटातील एक महत्त्वाचा सूत्रधार होता. या बॉम्बस्फोटात त्याची भूमिका महत्त्वाची होती,’ असे सीबीआयने टाडा न्यायालयात सांगितले होते.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मुस्तफा डोसा, अबू सालेम यांच्यासह पाच आरोपींना हत्या, कटकारस्थान याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. यासोबतच या सर्व आरोपींना टाडा कायद्यांतर्गतदेखील दोषी ठरवण्यात आले होते. १६ जून रोजी हा निकाल देण्यात आला होता. मुंबईतील १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता.