माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आणि मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केलं जातं आहे असं एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. १०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० नेत्यांच्या विरोधात आहेत असं बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत असाही आरोप वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. तसंच इम्तियाज जलील यांनीही हा प्रश्न संपला आहे. असं सांगितलं आहे. तसंच आम्ही सर्व धर्मीयांचा आदर करतो असंही वारीस पठाण यांनी म्हटलं आहे.  माझ्या वक्तव्याचा विपर्यास जाणीवपूर्वक केला गेला. भाजपाच्या १०० नेत्यांविरोधात मी बोललो होतो. मी देशविरोधी नाही असंही वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. तसंच मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असंही पठाण म्हणाले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते वारीस पठाण?
कर्नाटकातील गुलबर्गा या ठिकाणी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. “१०० हिंदू जनतेवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते हिसकावून घ्यावं लागेल” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर वादंग झाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत प्रसारमाध्यमांशी बोलायचं नाही असं ओवेसी यांनी सांगितलं होतं.

दरम्यान वारीस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. हक ए हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेने तर वारीस पठाण यांचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी घोषणाही केली. दरम्यान हे सगळे पडसाद उमटल्यानंतर वारीस पठाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. “आपण जे वक्तव्य केलं ते हिंदुविरोधी नाही. मी सर्व धर्मांचा आदर करतो. मी मोजक्या १०० लोकांच्या विरोधात बोललो होतो. हे भाजपा सरकारमध्ये मंत्री आहेत. काही संघाचे लोक आहेत. काही पत्रकार आहेत जे फक्त सीएएच कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तरीही मी जे बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी एक सच्चा भारतीय मुस्लीम आहे. माझं या महान देशावर प्रेम आहे. मुस्लिमांचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. ” असंही वारीस पठाण यांनी म्हटलं. या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी काही प्रश्न पठाण यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि वारीस पठाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे यापेक्षा जास्त ते काही बोलणार नाहीत. त्यांनी माफी मागितली आहे. या विषयापेक्षा इतरही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करा अशी विनंती मी करतो असं जलील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.