मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आपल्याला अतीव दुःख झालं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करतो आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जे या घटनेत जखमी झाले आहेत त्यांना लवकरात लवकर आराम पडू दे अशीही मी प्रार्थना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये असलेल्या कुरार या ठिकाणी भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली आहे.

एकीकडे रस्ते, लोकल वाहतूक या सेवेवर गंभीर परिणाम झालेला असतानाच मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. अती पावसामुळे ही भिंत खचली आणि त्याखाली दबून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान यांच्यातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले नाही ना? याचाही शोध घेतला जातो आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.