प्रसिद्ध ई-कामर्स वेबसाईट ‘मिंत्रा’ने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महिला कार्यकर्त्याने हा लोगो आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर कंपनीने लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुंबईस्थित महिला कार्यकर्त्या नाझ पटेल यांनी गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये सायबर सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती आणि त्यात मिंत्राने आपला लोगो बदलावा असं म्हटलं होतं. त्याचबरोबर महिलांचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मिंत्राचा लोगो नग्न महिलेच्या प्रतिमेप्रमाणे दिसत असल्याचा आरोप पटेल यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

या तक्रारीबाबत सांगताना सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर म्हणाल्या, “‘मिंत्रा’चा लोगो हा नैसर्गिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटत असल्याने यासंदर्भात ई-कॉमर्स कंपनीला आम्ही ई-मेलद्वारे कळवले. त्यानंतर मिंत्राने आम्हाला आश्वासनं दिलं की ते महिन्याभरात वेबसाईटवर, अॅप तसेच पॅकेजिंग मटेरिअलसाठी नवा लोगो वापरतील.

पटेल यांच्या तक्रारीनंतर नेटिझन्सनी सोशल मीडियावर मिंत्राला जुन्या लोगोवरुन चांगलेच झोडपले. याद्वारे महिलांचा अनादर केला जात असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणावर भाष्य करणारे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.