बसचालक अनुभवी; परिवहन विभागाचा अहवाल सादर

सुशांत मोरे, मुंबई</strong>

आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस कोसळून झालेल्या अपघातामागील गौडबंगाल अद्यापही कायम आहे. परिवहन विभागाकडून या अपघातामागील निष्कर्षांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र अपघातामागील मूळ कारणांचा शोध या अहवालातूनही समोर आलेला नाही. या घाटात सुरक्षा उपाययोजना आधीच असती, तर अपघात टाळता आला असता असाही निष्कर्ष देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातग्रस्त गाडीचे चालक हे अनुभवी होते, असेही नमूद केले आहे.

२८ जुलै रोजी दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे ३४ जण दापोली येथून महाबळेश्वरसाठी सहलीला निघाले होते. सहलीला निघण्यापूर्वी त्यांनी हास्यविनोदी वातावरणाचे छायाचित्रही काढले होते.

मात्र काही तासांच्या आतच आंबेनळी घाटात एका वळणावर बस येताच ती दरीत कोसळली व या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. याच बसमधून प्रवास करत असलेले प्रकाश सावंत यांनी बसमधून उडी मारल्याने ते मात्र बचावले. परंतु नेमका अपघात कसा झाला हे अद्यापही समजलेले नाही. या अपघातामागील नेमक्या कारणांचा शोध व निष्कर्ष काढण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला व त्याची माहिती घेऊन अहवाल तयार केला.

हा अहवाल परिवहन विभागाकडून शासनाला सादर केलेला आहे. अहवालात आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नसल्याचे नमूद केले आहे. घाटातील मार्ग हे अरुंद आहेत. त्यामुळे वाहनांना जाता-येतानाची अडचणही नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी कृषी विद्यापीठाचीच होती व गाडीचा वाहनचालक हा प्रशिक्षित होता.

दहा वर्षांपेक्षा जास्त वाहन चालविण्याचा अनुभव चालकाच्या गाठीशी होता. त्यामुळे अपघातग्रस्त गाडी अतिवेगात होती किंवा तिचा ताबा सुटला असेल, असेही घटनास्थळाला भेट दिल्यानंतर किंवा काही जणांशी संवाद साधल्यानंतर स्पष्ट झाल्याचे अहवालात आहे. त्या गाडीच्या परवान्यासह सर्व कागदपत्रेदेखील मुदतीत, असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आंबेनळी घाटात सुरक्षा उपाययोजना नाहीत. क्रॅश बॅरियर तसेच संरक्षक भिंत नसल्याने एखादा अपघात टाळता येत नाही. ज्या ठिकाणाहून अपघात झाला तेथे आता क्रॅश बॅरियर बसविण्यात आले. अपघातापूर्वी तेथे क्रॅश बॅरियर बसवण्यासाठी काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी खड्डेही खणण्यात आल्याचे सांगण्यात आले.

२०० ते ३०० फूट खोल दरीत बस कोसळलेली आहे. ही बस वर काढणे कठीण आहे. मात्र ती बस तपासता आली असती तर बसमध्ये काही तांत्रिक बिघाड तर झाला नव्हता याचा देखील तपास करणे शक्य झाले असते, असे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एखादा अपघात झाला तर त्यामागील नेमके कारण कोणते व त्यावर कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, यासाठी त्या अपघाताचा अहवाल तयार केला जातो. आंबेनळी घाटात झालेल्या अपघाताचाही अहवाल तयार करण्यात आला आहे. मात्र नेमका अपघात कसा झाला हे समोर आलेले नाही.

– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त