उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेले वाहन सापडल्याप्रकरणी गूढ आणखी वाढले. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आला.

हिरेन यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. असे असले तरी, आत्महत्या की हत्या, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ठाण्यातील  डॉ. आंबेडकर मार्गाजवळील विकास पाम इमारतीमध्ये मनसुख हिरेन हे कुटुंबासमवेत राहत होते. त्यांचे वंदना सिनेमा परिसरात कार सजावटीचे दुकान आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन गेल्या आठवडय़ात सापडले. मुंबई पोलिसांच्या तपासात हे वाहन मनसुख यांचे असल्याचे समोर आले. तेव्हापासून त्यांची याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू होती. असे असताना गुरुवारी रात्री ते बेपत्ता झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय त्यांचे मित्र संदीप खांबे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊच शकत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

मृत्यूपूर्वी मनसुख यांनी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींच्या चौकशीचा मन:स्ताप होत असल्याची तक्रार केली होती, असे समजते. मात्र दोन्ही पोलीस आयुक्तालयांमधून मनसुख यांच्या तक्रारीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परामबीर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले.

नेमके काय घडले?

एक दूरध्वनी आल्यानंतर मनसुख हिरेन घोडबंदर येथे जात असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगून गुरुवारी रात्री घराबाहेर पडले. ते घरी परतलेच नाही. शुक्रवार दुपापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होत नसल्यामुळे हिरेन कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीतील वर्णनाशी मुंब्रा खाडीत शुक्रवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन जुळत असल्याने पोलिसांकडूून ही बाब समोर आली.

मनसुख यांची आत्महत्या की हत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

– संजय येनपुरे, ठाणे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)

घातपाताचा संशय

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बोलावल्याने हिरेन गुरुवारी रात्री घराबाहेर पडले होते. ते आत्महत्या करूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया विमला मनसुख यांनी माध्यमांकडे व्यक्त केली. प्रत्येकवेळी हिरेन यांनी चौकशी-तपासास सहकार्य केले. गुरुवारी रात्री कांदिवली येथील तावडे नावाच्या अधिकाऱ्याने हिरेन यांना घोडबंदर रोड येथे भेटण्यासाठी बोलावले होते. रात्री १० वाजल्यानंतर त्यांचा मोबाइल बंद झाला. त्यामुळे आम्ही पोलीस तक्रार केली. चौकशीमुळे ते चिंताग्रस्त नव्हते, असेही विमला यांनी सांगितले.