उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सचिन वाझेंसोबत हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहे. सचिन वाझे दक्षिण मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आले तेव्हा ही महिलादेखील त्यांच्या मागून प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही महिला नेमकी कोण आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न एनआयएकडून सुरु आहे.

मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी सचिन वाझे हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. तपासादरम्यान सचिन वाझे यांनी बनावट आधार कार्ड वापरल्याचं समोर आलं आहे. याशिवाय हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एक अज्ञात महिला त्यांच्यासोबत होती असंही एएनआयएच्या तपासात उघड झालं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझे क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये असताना तपास करत असलेल्या एखाद्या दुसऱ्या प्रकरणात या महिलेची चौकशी केली जात होती. एनआयएने सचिव वाझे यांच्याकडे महिलेसंबंधी चौकशी केली, मात्र ते तपासात सहकार्य करत नाही आहेत. एनआयए सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी महिलेसंबंधी कोणतीही माहिती किंवा काय नातं होतं हे सांगण्यास नकार दिला आहे.

महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु असून येत्या काही दिवसांत तिला समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान एनआयएकडून हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. पाच दिवस हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना सचिन वाझे यांनी कोणाकोणाची भेट घेतली याची माहिती मिळवण्याचा एनआयएकडून प्रयत्न सुरु आहे.

याशिवाय सचिन वाझे यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे पाच बॅग होत्या. सीसीटीव्हीत सचिन वाझे पाच काळ्या बॅग घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. यासंबंधी एनआयए हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे. या बॅग अद्याप एनआयएच्या हाती लागलेल्या नाहीत.