संदीप आचार्य 
मुंबई: संपूर्ण देशात करोना पसरला असून डॉक्टर, परिचारिका व करोना रुग्णांचा सामना करणार्या आरोग्य सेवकांना एन ९५ मास्क व पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट म्हणजे करोना संरक्षित पोषाख कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता एन ९५ मास्क व पीपीई यांचे निर्जंतुकीकरण करून पुनर्वापर करण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत असून यासाठी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात वा केवळ देशातच नव्हे तर जगातील अनेक देशात एन ९५ मास्क व करोना संरक्षित पोषाखांची कमतरता दिसून येते. यापूर्वी केवळ करोना रुग्णांवर थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच केवळ पीपीइ किट द्यावा, अशी मार्गदर्शक तत्वे ‘आयसीएमआर’ने निश्चित केली होती. त्यानुसारच सुरुवातीला एन ९५ मास्क व पीपीई किट देण्यात येत होते. तथापि करोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असल्यामुळे पीपीई किट व एन ९५ मास्क ची मागणी वाढू लागली.

करोना विभागात काम करणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त हॉटस्पॉटच्या ठिकाणी नोंदणी करणारे पालिकेचे कर्मचारी, पोलीस तसेच रुग्णवाहिका चालक यांनाही हे मास्क व पीपीई किट आवश्यक ठरू लागले. आज अनेक पोलिसांनाही करोनाची लागण झाली असून थेट करोना विभागाशिवाय रुग्णालयात अन्य विभागात काम करणार्या अनेक कर्मचार्यांनाही करोनाची लागण झालेली दिसून येत आहे. एकीकडे पीपीई किटची कमतरता भासत असल्याने सरकारने युद्धपातळीवर हे पीपीई किट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी हे किट बनविणाऱ्या संबंधित कंपन्यांना विनंतीही करण्यात येत आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ तसेच साधनसामग्री अभावी पीपीई किट मिळणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. जगातील काही देशांनी एन ९५ मास्क व पीपीइ किट निर्जंतुक करून त्याचा पुनर्वापर करता येतो हे दाखवून दिले. याचा अभ्यास दिल्लीतील  ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ एम्स ने तसेच मुंबईतील जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी करून योग्य प्रक्रियेनंतर पुनर्वापर करता येतो हे दाखवून दिले.

 

पीपीई किट व एन ९५ मास्क निर्जंतुक करण्याची प्रक्रिया, त्यासाठी लागणारी जागा, रसायन आदी सर्व तपशील ‘एम्स’च्या अहवालात देण्यात आला आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सुक्षमजीवशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांची समिती २४ एप्रिरोजी नियुक्त केली आहे. या समितीत केईएमच्या डॉ गिता नटराजन, नायर रुग्णालयाच्या डॉ शास्त्री, जेजे च्या डॉ छाया चांदे, डॉ अमिता जोशी, हाफकीनने माजी प्रमुख डॉ अभय चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ उल्हास मासलकर या सात सदस्यांचा समावेश आहे. “ही समिती एम्स व जे जे च्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करून आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल”, असे डॉ साधना तायडे यांनी सांगितले.

मुंबई व पुण्यात रुग्णांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता निर्जंतुकीकरण करून पुनर्वापर हा एक पर्याय ठरू शकतो. एम्सनेही त्यांच्या अहवालात अन्य पर्याय नसल्यासच मास्क व पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून पुनर्वापर करावे असे नमूद केले आहे.