महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो असंही मत नाना पाटेकर यांनी नोंदविले आहे. तसंच वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं ज्यामुळे शेतकऱ्याला आधार वाटेल, अशी प्रतिक्रियाही नाना पाटेकर यांनी दिली आहे.

जलसंधारणाचं काम आणि नाम फाऊंडेशनने आत्तापर्यंत केलेले काम मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. तसेच आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांनी, प्रसिद्ध आणि सधन व्यक्तींनी एकत्र येऊन शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे असंही पाटेकर यांनी म्हटलंय.

मंगळवारी मध्यप्रदेशात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरही नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. नाम फाऊंडेशन ही संस्था गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचं काम करते आहे. या संस्थेला लोकांचंही पाठबळ मिळतं आहे. आम्हाला कोणतेही पुरस्कार किंवा मानसन्मान देऊ नका त्याऐवजी शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी एकत्र या, असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा राज्यात गाजतो आहे. १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे ज्यानंतर शहरांची कशी कोंडी होते ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मंगळवारी शेतकरी कर्जमाफी व्हावी अशी मागणी करत शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. अशात आता नाम फाऊंडेशननेही संपाला पाठिंबा देत कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामुळे सरकारवरचा दबाव वाढतो आहे यात काहीही शंका नाही.