News Flash

नागपाडा, नायगाव पोलीस रुग्णालयांच्या वेळेत कपात

आजारी पोलिसांची गैरसोय

संग्रहित छायाचित्र

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील उपचार तसेच शारीरिक आरोग्य क्षमता प्रमाणपत्रांसाठी नागपाडा तसेच नायगाव येथील पोलीस इस्पितळातील बाह्य़रुग्ण विभागाची वेळ अचानक कमी करण्यात आली आहे.  परिणामी, पोलिसांची गैरसोय होत आहे.

पोलीस शल्यचिकित्सक डॉ. एम. एस. पाटील यांच्या आदेशाने ही वेळ कमी करण्यात आली आहे. नागपाडा येथील इस्पितळ सध्या नूतनीकरणाच्या नावाने बंद आहे, तर नायगाव येथील इस्पितळ सुरू असले तरी फक्त चार खाटांची व्यवस्था आहे. या दोन्ही इस्पितळांचा बाह्य़रुग्ण विभाग रात्रंदिवस सुरू असल्यामुळे पोलिसांना त्याची मदत होत होती. मात्र करोना प्रादुर्भाव झाल्यानंतर ३ एप्रिलपासून नागपाडा येथील बाह्य़रुग्ण विभाग दुपारी एक वाजेपर्यंत तर नायगाव येथील बाह्य़रुग्ण विभाग दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच इतर पोलिसांना शारीरिक आरोग्य प्रमाणपत्र तसेच विविध रोगांवरील उपचारासाठी बाह्य़रुग्ण विभागात यावे लागते. दररोज जवळपास दोनशे ते अडीचशे पोलीस या बाह्य़रुग्ण विभागाचा लाभ घेत असतात. यापैकी अनेक पोलीस दूरवरून येतात. परंतु वेळेत कपात करण्यात आल्यामुळे त्यांची कमालीची गैरसोय झाली आहे.

एकीकडे खासगी दवाखाने बंद असल्यामुळे पोलिसांसाठी ही इस्पितळे खुली राहणे आवश्यक होते. करोनाच्या पाश्र्वभूमीवर या इस्पितळांचा वापर करून घेता येऊ शकला असता. परंतु त्याऐवजी बाह्य़रुग्ण विभागाच्या वेळेत कपात करण्याचे कारण काय ते कळू शकलेले नाही. मात्र पोलीस नाराजी व्यक्त करीत आहेत. याप्रकरणी डॉ. पाटील वा सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांचा संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 12:50 am

Web Title: nagpada naigaon police hospitals cut short on time abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अन्य आजारांसाठी ‘केईएम’ची मदतवाहिनी
2 मुंबईतील मृतांची संख्या ७६ वर
3 धारावीसाठी स्वतंत्र कृती आराखडा
Just Now!
X