राज्यात सुमारे पाच महिन्यानंतर २४ तासात १० हजारांपेक्षा अधिक करोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. नागपूरमध्ये १२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

राज्यात गेले काही दिवस आठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. गेल्या २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिवसभरात नागपूर १२२५, पुणे शहर ८४९, पिंपरी-चिंचवड ५४९, उर्वरित पुणे जिल्हा ३६९, नाशिक शहर ३५२, जळगाव जिल्हा ५४०, सातारा २१४, औरंगाबाद ३१८, अकोला १४८, अमरावती शहर ४३५, यवतमाळ २५१, वाशिम २०७ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट

मुंबईत शुक्रवारी करोनाचे १,१७३ नवे रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या पुढे गेली असून रुग्ण दुपटीचा कालावधी २४१ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३,३१,०१६ झाली आहे, तर मृतांची एकूण संख्या ११,४९० वर गेली आहे. एका दिवसात १,१५१ रुग्ण बरे झाले असल्याने आतापर्यंत ३,०८,१७८ म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून सध्या १०,४६९ रुग्ण उपचाराधीन आहेत. गुरुवारी १९,९०८ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ३३ लाख ७२ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.२९ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधीही २४१ दिवसांपर्यंत खाली गेला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी एका दिवसात ११,५३२ अधिक निकट संपर्क शोधण्यात आले.