ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी समीत ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

धर्मेंद्र मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, समीत ठक्कर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जून आणि जुलै महिन्यात फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने त्यांची तुलना मुघल राजशी केली होती. त्याने नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती. तक्रारीनंतर व्ही पी रोड पोलिसांनी समीत ठक्करविरोधात बदनामीचा तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी समीत ठक्कर याला आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.