दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने सलग तिसऱ्या दिवशी टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक बंद आहे. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच लोकल ट्रेन सुरु असून मध्य रेल्वेवरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु आहे.

मंगळवारपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. मंगळवारी सकाळी आसनगाव- वाशिंददरम्यान नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे खोळंबली. बुधवारीदेखील मध्य रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरु होती.

टिटवाळा- कसारा मार्गावर रेल्वेच्या पथकाला अपघातग्रस्त दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आले होते. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे डबे हटवण्यात आले होते. डबे हटवण्यात आले असले तरी या मार्गावर अजूनही ओव्हरहेड वायर आणि अन्य तांत्रिक कामे बाकी आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळीदेखील टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल सेवा बंद आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेवरील वाहतूकही विलंबाने सुरु असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक ठप्प असल्याने कसारा, आसनगाव येथे राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.