कल्याण तालुक्यात पोलीस-शेतकऱ्यांमध्ये संघर्ष; १६ जणांविरोधात गुन्हे

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास होणारा शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने आता पोलीस बळाचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हय़ात तर स्थानिक पोलिसांबरोबरच शीध्र कृती दलाच्या तुकडय़ांच्या प्रचंड बंदोबस्तात शेतकऱ्यांना हुसकावून लावून जमिनींचे सर्वेक्षण केले जात आहे. सरकारच्या दडपशाहीने अस्वस्थ झालेले शेतकरी आणि पोलीस यांच्यात बुधवारी कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे जोरदार संघर्ष झाला. त्यात काही शेतकरी आणि पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी १६ शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारची दडपशाही अशीच सुरू राहिली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही. कोणत्याही प्रकारे बळाचा वापर केला जाणार नाही असे सरकार वारंवार सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना हुसकावून लावून जमिनीची मोजणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]

दडपशाही मार्गाने जमिनी ताब्यात घेत आहेत. शेतकऱ्यांना कोणताही माहिती दिली जात नाही, असा आरोप कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केला आहे. हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असून जिल्हा प्रशासनाने ही दडपशाही थांबविली नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि त्याची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल असेही पाटील यांनी सांगितले.

फळेगाव येथे पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी करण्यास आलेल्या महसूल अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले. मात्र शीघ कृतिदलाच्या दोन तुकडय़ा आणि पोलीस यांनी शेतकऱ्यांना बळजबरीने हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी झालेल्या संघर्षांत काही पोलीस जखमी झाले असून शेतकऱ्यांनाही मारहाण झाल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे.

जिल्हाधिकारी अनभिज्ञ

यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी मात्र कानावर हात ठेवले. अशी काही कारवाई अथवा पोलीस-शेतकऱ्यांच्यात संघर्ष  झाल्याचे किंवा पोलीस बळाचा वापर झाल्याचे आपणास माहीतही नाही, असे ते म्हणाले.

[jwplayer 2hVNZXIE-1o30kmL6]