तीन दिवसांत दीड लाखांपैकी फक्त दीड हजार उत्तरपत्रिकांची तपासणी

ऑनलाइन मूल्यांकनाच्या अव्यवहार्य निर्णयामुळे अडचणीत आलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्या मदतीला नागपूर विद्यापीठ धावून आले असले तरी शिक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे गेल्या तीन दिवसात केवळ नागपूरकडून दीड लाखांपैकी केवळ दीड हजार उत्तरपत्रिकांचेच ऑनलाइन मूल्यांकन करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांचे ठिगळ जोडण्यासाठी नागपूरचे प्रयत्न तोकडेच पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयत्या वेळी सर्व परीक्षांचे संगणकाधारित ऑनस्क्रीन (ऑनलाइन) मूल्यांकन करण्याच्या कुलगुरूंच्या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचे तब्बल ४७७ परीक्षांचे निकाल रखडले आहेत. निकालांना होत असलेल्या विलंबामुळे राज्यपालांनी कुलगुरूंना राजभवनवर बोलावून खडसावले. ३१ जुलैपूर्वी सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची तंबी राज्यपालांनी दिल्यामुळे विद्यापीठाचीतारांबळ उडाली आहे. गेल्या आठवडय़ात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’ने मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या दीड ते दोन लाख उत्तरपत्रिका (आयडॉलच्या) तपासण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. यासाठी दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुंबईत बैठकही पार पडली. परंतु, नागपुरात शिक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने आतापर्यंत केवळ १५०० उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत.

नागपूर विद्यापीठाशी संलग्नित धनवटे नॅशनल महाविद्यालयात ऑनलाइन मूल्यांकन सुरू आहे. आतापर्यंत नागपूरमधील १५० शिक्षकांना प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी आयडी देण्यात आला आहे. परंतु, मूल्यांकनाकरिता नागपूरमधील शिक्षक फारसे फिरकत नसल्याने गेल्या तीन दिवसांत केवळ दीड हजार उत्तरपत्रिका तपासण्यात विद्यापीठाला यश आले आहे. ‘शुक्रवारी ५० ते ६० शिक्षकांनी ऑनलाइनकरिता केंद्रावर हजेरी लावली. मात्र मुंबईचे ऑनलाइन मूल्यांकनाचे सॉफ्टवेअरमध्ये नागपूरपेक्षा वेगळे असल्याने मूल्यांकनाच्या कामाला अपेक्षित वेग आलेला नाही,’ अशी माहिती धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य बबनराव तायवडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

नियमानुसार विद्यापीठाच्या संबंधित विषयाच्या अभ्यासमंडळाच्या प्रमुखाने उत्तरपत्रिका मूल्यांकन करण्याकरिता शिक्षकांची पात्रता तपासून यादी करणे आवश्यक असते. याच शिक्षकांना मूल्यांकन करता येते. नागपूरच्या बाबतीत शिक्षकांची पात्रता कुणी तपासली असा प्रश्न उद्भवतो. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नये म्हणूनही नागपूरमधील अनेक शिक्षक मूल्यांकनाच्या कामापासून दूर राहिल्याची चर्चा आहे.

राज्यपालांकडे तक्रार

नागपूरमधील शिक्षकांकडून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या निर्णयावर नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी तो महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करीत आक्षेप नोंदवला आहे. याविरोधात त्यांनी राज्यपालांकडे तक्रारही नोंदविली आहे. नागपूर विद्यापीठाने आपल्या व्यवस्थापन परिषदेकडून मान्यता घेत, नागपुरात मूल्यांकन करायचे ठरविले असले तरी ते बेकायदेशीर आहे, असा मिश्रा यांचा आक्षेप आहे.