नायगावमधील मैदानावर क्लब उभारण्याच्या निर्णयाला विरोध

मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टरांसाठी नायगावच्या पुरंदरे मैदानात क्लब उभारण्याचा पालिकेचा घाट उधळून लावण्यासाठी परिसरातील रहिवासी एकवटले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याऐवजी ‘नोटा’चा पर्याय अवलंबण्याचा निर्णय रहिवासी आणि क्रीडापटूंनी घेतला होता. नायगावकरांना तसे आवाहनही करण्यात आले होते. त्यासंदर्भात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्याही परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आल्या होत्या. या मोहिमेमुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मात्र धाबे दणाणल्याची चर्चा आहे.

चित्रा थिएटरसमोरच्या गल्लीमधील पुरंदरे मैदानामध्ये नायगाव, शिवडी, लालबाग, दादर परिसरातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी येतात. तिथे विविध क्रीडाप्रकारांच्या सामन्यांचे आयोजनही करण्यात येते. या मैदानात केईएम रुग्णालयामधील डॉक्टरांसाठी क्लब उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसे झाल्यास मैदानात प्रवेश मिळणे अवघड होईल या भीतीमुळे परिसरातील क्रीडापटू आणि रहिवाशांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. आंदोलने करण्यात आली, राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या, मात्र केवळ आश्वासनेच मिळाली.

राजकारण्यांना धडा शिकविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय अवलंबिण्याचे आवाहन क्रीडापटूंनी नायगावकरांना केले होते. त्यासंदर्भात ‘लोकसत्ता मुंबई’ मध्ये ‘पुरंदरे मैदान वाचविण्यासाठी निषेधाचे मतदान’ या मथळाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्याच्या मोठय़ा छायांकित प्रती काढून त्या नायगाव परिसरातील इमारतींवर चिकटविण्यात आल्या होत्या. व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरही संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती.

काही नेत्यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावणे धाडले होते. मात्र नेत्यांना अद्दल घडविण्यावर सर्वाचे एकमत झाले. विधानसभा निवडणुकीत या निषेधाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुरंदरे मैदानात उभारण्यात येणारा क्लब रद्द करावा, अशी मागणी क्रीडापटूंकडून करण्यात आली आहे.

बंदरावर शुकशुकाट

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाला वरळीतील कोळी बांधव आणि अमरसन्स परिसरातील रहिवाशांनी व संस्थांनी विरोध केला आहे. समुद्रातील भरावामुळे सागरी जैवविविधता धोक्यात आली असून मासेमारीवर परिणाम होण्याची भीती कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. मासेमारीवर परिणाम होऊन उपासमारीची वेळ ओढवण्याची भीती कोळी बांधवांना आहे. त्यामुळे ते प्रकल्पाच्या विरोधात खडे ठाकले आहेत. या पाश्र्वभूमीवर वरळी कोळीवाडय़ातील कोळी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकला. बहुसंख्य कोळी बांधव सोमवारी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते.