|| शैलजा तिवले

शस्त्रक्रिया रखडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची नाराजी

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील एक शस्त्रक्रियागृह गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने अनेक स्त्रियांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. याचा फटका महिला रुग्णांना बसत असून  त्यांना एकतर दुखणे अंगावर काढावे लागत आहे किंवा मग नाईलाजाने खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

नायरच्या स्त्रीरोग विभागात पाचव्या मजल्यावर एक आणि तिसऱ्या मजल्यावर एक अशी दोन शस्त्रक्रियागृह आहेत. यातील पाचव्या मजल्यावरील शस्त्रक्रियागृहामध्ये विविध प्रकारच्या स्त्रीरोगांशी निगडित आजारांवर शस्त्रक्रिया केली जाते. परंतु हे शस्त्रक्रियागृह जवळपास गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या स्त्रीरोगांशी निगडित शस्त्रक्रिया सध्या रुग्णालयात पूर्णपणे बंद आहेत. तिसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रियागृहामध्ये तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रसूतीशी निगडित शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे गर्भपिशवी, अंडाशय इत्यादी अवयवांशी संबंधित आजारांवरील शस्त्रक्रिया सध्या होऊ शकत नाही, असे रुग्णांना सांगून थेट एक ते दोन महिन्यानंतर येण्यास सध्या सांगितले जात आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या वैशाली चव्हाण (३५) यांना गेल्या तीन वर्षांपासून अनियमित पाळी, अतिरक्तस्राव याचा त्रास होत आहे. त्यांच्या अंडाशयामध्ये गाठी येत असल्याने त्यावर नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया  केली गेली. परंतु तरीही त्रास सुरूच होता. १९ जुलै रोजी त्या नायर रुग्णालयात गेले असता शस्त्रक्रियागृह बंद असल्याने आता शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. तेव्हा दोन महिने रक्तवाढीची औषधे सुरू ठेवून त्यानंतर येण्यास डॉक्टरांनी सांगितले. नायरमध्ये अगदी कमी खर्चात ही शस्त्रक्रिया होते. खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास एक लाख रुपये खर्च सांगितला आहे. मला त्रास होत असल्याने अजून दोन महिने वाट पाहणे शक्य नाही. आता खासगीमध्ये शस्त्रक्रिया करणे भाग असल्याचे वैशाली यांनी सांगितले.

शस्त्रक्रियागृहाची दुरुस्ती सुरू असल्याने ते बंद आहे. मात्र रुग्णांना शीव आणि केईएम रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. तसे संबंधित रुग्णालयांना पत्राद्वारे कळविले आहे. पुढील १५ दिवसांमध्ये काम पूर्ण होऊन शस्त्रक्रियागृह पूर्ववत सुरू केले जाईल.     – डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय