News Flash

नायर रुग्णालयाचे संपूर्ण कोविड रुग्णालयात रुपांतर करणार – आयुक्त चहल

'मार्ड'ने आंदोलन केल्यास कठोर कारवाई

संग्रहीत

मुंबईत प्रचंड वेगाने करोना रुग्ण वाढत असल्याने या वाढत्या करोना रुग्णांचे जीव वाचवणे हे पालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयाचे पुन्हा ‘कोविड’ रुग्णालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले असून निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने याविरोधात सामुहिक रजा आंदोलन अथवा अन्य कोणते आंदोलन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.

करोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेने खाजगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. आगामी काळात रुग्णालयात खाटा कमी पडतील हे लक्षात घेऊन जम्बो रुग्णालये सुरु करण्याबरोबरच पालिकेच्या नायर रुग्णालयाचे ‘करोना रुग्णालयात’ रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही नायर रुग्णालयातील ११०० खाटा करोना रुग्णालयात परावर्तीत करण्यात आला होता. याचा मोठा फायदा करेना रुग्णांना झाला. याच काळात जवळपास हजारभर बाळंतपणे नायर रुग्णालयात पार पडली. आज करोना ज्या प्रकारे वाढत आहे ते पाहाता पुन्हा नायर मधील ११०० खाटा करोना रुग्णांवरील उपचारासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असताना अचानक अभ्यास व वैद्यकीय अनुभवाचा मुद्दा मांडत ‘मार्ड’ने सामुहिक रजेच हत्यार उपसणे हे हजारो करोना रुग्णांवर अन्याय करणारे असल्याचे इक्बालसिंग चहल यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मार्ड’च्या डॉक्टरांबरेबर आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनी वाढता करोना तसेच पालिकेला कशा कशाचा सामना करावा लागते व काय आव्हाने आहेत ते समजावून सांगितले होते. तथापि तेव्हा मार्ड’चे डॉक्टर चर्चेच्या मानसिकतेत नव्हत तर आम्ही काय सांगतो तेवढच एेकायच ही त्यांची भावना व भाषा होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका आयुक्त चहल यांनी या निवासी डॉक्टरांना सर्वप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नायरच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आपला हेका न सोडता उद्या एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे.

‘मार्ड’ने याबाबत पालिका प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी नायर रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर केले तेव्हा आम्ही निवासी डॉक्टरांनी सर्व शक्तीनिशी करोना रुग्णांची सेवा केली. या सर्वात आम्ही ज्या विषयांचा अभ्यास करत आहोत त्याचा आम्हाला पुरेसा अनुभव घेता आला नाही. आता जर पुन्हा नायर रुग्णालयाचे करेना रुग्णालयात रुपांतर होणार असेल तर आमच्या शिक्षणाच्या हक्काचे ते उल्लंघन असेल. आम्हाला योग्य अभ्यास व अनुभव मिळणार नसेल तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यामुळे करोना रुग्णालयात रुपांतर करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी नायरमधील निवासी डॉक्टर उद्या एक दिवसासाठी सामुहिक रजेवर जातील. एकट्या नायर रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर का, असा सवाल करत पालिकेच्या अन्य वैद्यकीय महाविद्यालयात समान पद्धतीने करोना रुग्णांवर उपचार केले जावे तसेच उपनगरीय रुग्णालयात करोना रुग्णांची व्यवस्था करावी आणि यासाठी आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी ‘मार्ड’ने पालिका प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे. तसेच मागणी मान्य व्हावी म्हणून उद्या एक दिवसाची सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे.

याबाबत आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या आठवड्यात निवासी डॉक्टरांना आम्ही मुंबईच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली तसेच १ मे नंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नायर चे सामान्य रुग्णालयात रुपांतर केले जाईल याची हमी दिली. आगामी काही दिवसात करोना वाढणार आहे त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेणार आणि स्वतःच्या रुग्णालयात उपचार करणार नाही, असे तर होऊ शकत नाही असे सांगून आयुक्त म्हणाले, नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना या निवासी डॉक्टरांबरेबर बोलायला सांगितले आहे. मात्र जर उद्या त्यांनी सामुहिक रजेचे हत्यार उपसून रुग्णांना डावाला लावण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यात एपिडेमिक अॅक्ट १८९७ लागू असून त्याअंतर्गत मार्डच्या नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही आयुक्त चहल यांनी दिला. करोना रुग्णांचे जीव हे आत्ताच्या क्षणी डॉक्टरांच्या अनुभवाच्या मुद्द्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे असेही आयुक्तांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 8:23 pm

Web Title: nair hospital to be converted into entire covid hospital commissioner chahal msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 गृहमंत्र्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 ‘सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा’ व शिवसेनेचा ‘रक्त संकलनाचा संकल्प’
Just Now!
X