संदीप आचार्य 
मुंबई: मुंबईत जसजसे करोनाचे रुग्ण वाढत आहेत तसे महापालिका प्रशासन व डॉक्टर चिवटपणे करोनाची लढाई लढत आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर प्रभावी व परिणामकारकपणे उपचार करता यावे यासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयाचे आता ‘करोना स्पेशालिटी रुग्णालयात’ रुपांतर करण्यात येत आहे. अवघ्या आठवडाभरात तब्बल ८०० खाटांची सुसज्ज व्यवस्था उभी करण्याचे आव्हान येथील डॉक्टरांनी स्वीकारले आहे.

मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या रोज वाढत आहे. आठशेहून अधिक हॉटस्पॉट याचाच अर्थ रुग्ण वाढत राहाणार हे लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी रुग्णालयांची व्यवस्था अधिक परिणामकार करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोज राज्यासह मुंबईतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत असून किडनी, कॅन्सर, ह्रदयविकार तसेच अन्य मोठे आजार असलेल्या करोना रुग्णांना प्रभावी उपचार मिळून त्यांचे जीव वाचावे यासाठी ठोस व्यवस्था करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. यानंतर पालिकेच्या नायर रुग्णालयाचे ‘करोना स्पेशालिटी रुग्णालया’त रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची जबाबदारी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांच्यावर सोपविण्यात आली. तर त्यांना लागणारी सर्व मदत व नियोजन उपलब्ध करून देण्याचे काम करोनाचा सामना करण्यासाठी विशेष नियुक्ती करण्यात आलेल्या मनिषा म्हैसकर यांना देण्यात आली. डॉ मोहन जोशी यांनी यापूर्वी सेव्हन हिल्स रुग्णालयाचे स्पेशालिटी रुग्णालयात रुपांतर करून रुग्णसेवा प्रभावीव करण्याचे काम केले होते. तसेच मुंबईच्या वैद्यकीय टास्क फोर्सचे प्रमुख असलेल्या डॉ संजय ओक हेही नायर रुग्णालयाच्या कामात सहकार्य करत आहेत.

पालिकेच्या नायर रुग्णालयात १४५० खाटा असून आज घडीला करोनाच्या गंभीर व अत्यावस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात १८ खाटा तर अन्य १८२ खाटा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे केवळ गंभीर व अत्यावस्थ रुग्णांनाच दाखल करण्यात येणार असून सध्या ६० रुग्ण दाखल असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे येथे सहा गर्भवती महिला दाखल झाल्या असून यातील चौघांनी आपल्या बाळाला जन्मही दिला. या करोनाबाधित मतांना बाळाची काळजी कशी घ्यायची हेही सांगण्यात आले आहे.
“आगामी आठवडाभरात आम्हा करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ८०० खाटांची व्यवस्था करणार आहोत. यातील प्रत्येक खाटेजवळ अॉक्सिजनची व्यवस्था असेल तसेच पुरेसे व्हेंटिलेटर असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे करोनामुळे एखाद्या रुग्णाला गंभीर किडनी विकार झाल्यास त्यांच्यासाठी डायलिसीसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच ज्या डायलिसिस रुग्णांना करोनाची लागण झाली त्यांच्यासाठी डायलिसीसची व्यवस्था करण्यात येणार आहे” असंही डॉ जोशी म्हणाले.

याशिवाय गर्भवती महिला व कॅन्सर रुग्ण ज्यांना करोनाची लागण आहे अशांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. केमोथेरपी तसेच सर्जरीची जबाबदारी डॉ गिरीश राजाध्यक्ष पाहाणार आहेत. डॉ सतीश धारप, डॉ मोहीते, डॉ अल्का सुब्रमण्यम, डॉ सारीका पाटील, डॉ सुरभी राठी आदी सर्वच डॉक्टर यासाठी जीव तोडून काम करत असल्याचे डॉ मोहन जोशी म्हणाले. येथे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली असून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सोशलवर्कर डेस्क तयार करण्यात आले. तेथे त्यांच्या दाखल असलेल्या रुग्णाची माहिती दिली जाईल. याशिवाय घोषणा व्यवस्था करण्यात आली असून वॉर्डातील परिचारिका खाली असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती देतील असेही डॉ जोशी म्हणाले.
करोनाची भीती सर्वांनाच आहे. यात डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालय कर्मचारीही आले. या सर्वांसाठी दररोज प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून दररोज ५० जणांना प्रशिक्षण देऊन करोनाची भीती दूर करण्याचे पद्धतशीर प्रयत्न
केले जात आहेत.

ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची विशेष परवानगी आयुक्तांनी दिल्याचे डॉ जोशी म्हणाले. डॉक्टर व परिचारिकांना दुपारच्या वेळी तयार नाश्त्याची पाकीट, चिक्की, अमुल लस्सी आदी देण्याची विनंती नायर रुग्णालयाचे अॅल्युमिनाय असलेल्या माजी विद्यार्थ्यांना केली असून त्यांनीही ते मान्य केले आहे. आमच्या हातून जास्तीतजास्त रुग्ण बरे व्हावेत, मृत्युच्या दाढेतून त्यांना बाहेर काढता यावे हिच आमची इच्छा असल्याचे डीन डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.