|| अक्षय मांडवकर

संस्था : नालंदा नृत्यकला महाविद्यालय

भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचे शास्त्रोक्त आणि सर्वागाने शिक्षण देणारी आणि त्यामधील संशोधनासाठी वाटा करून देणारी संस्था म्हणून ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ ही संस्था सर्वपरिचित आहे. केवळ उच्चवर्गातील मुला-मुलींनीच शास्त्रीय नृत्यशैलींचे शिक्षण घ्यावे, असा समज समाजात रुजला असताना तो मोडून काढत मध्यमवर्गीय ते अगदी आदिवासी समाजातील मुलींना शास्त्रीय नृत्यकलेचे देण्यासाठी नालंदा नृत्यकला महाविद्यालयाने त्यांना सामावून घेतले. असे धाडसी पाऊल टाकण्याचा निर्णय मोहनीअट्टम नृत्यशैलीच्या सर्वेसर्वा आणि ‘नांलदा’च्या संस्थापिका डॉ. कनक रेळे यांनी घेतला. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे आज या संस्थेत दरवर्षी सुमारे १२० विद्यार्थी वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्यशैलींचे शिक्षण घेत आहेत. नृत्याकडे केवळ कला म्हणून न पाहता त्या शैलीच्या मुळापर्यंत जाऊन सखोल पद्धतीने तिचा अभ्यास करून ती अंगीभूत करण्याकडे नालंदा नृत्यकला महाविद्यालयाचा कल आहे.

भगवान बुद्ध ज्या वेळी नालंदा येथे गेले तेव्हा त्यांना त्या भूमीची वेगळी अनुभूती झाली. सतत ज्ञानार्जन करणारी भूमी म्हणून नालंदा ओळखली जाऊ लागली. याची प्रेरणा घेऊन डॉ. कनक रेळे यांनी नृत्याचे सखोल ज्ञान देणारी नालंदा नृत्य कला महाविद्यालय या संस्थेची स्थापना १९७२ साली केली. डॉ. कनक रेळे यांच्या कुटुंबाची पाश्र्वभूमी कलाक्षेत्रातील नव्हती. त्यांचा जन्म गुजराती व्यापारी कुटुंबामध्ये झाला होता. मात्र कनकजींच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये दाखल केले आणि त्यांच्या नृत्यकलेचा प्रवास सुरू झाला. मामा शास्त्रीय कलांना प्रोत्साहन देणारे असल्याने कनकजींना कथकली आणि मोहिनीअट्टम या दाक्षिणात्य शास्त्रीय नृत्यशैलीची गोडी लागली. याच वेळी त्यांना कथकली गुरू करुणाकर पणिकर भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नृत्य शिक्षणाला सुरुवात केली. याचदरम्यान त्यांचा क्रिकेटपटू यतीन रेळे यांच्याशी विवाह झाल्याने त्या उच्चशिक्षणासाठी इंग्लडला गेल्या. कायद्याची पदवी घेऊन भारतात पुन्हा परतल्यानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर कनकजी मोहिनीअट्टम नृत्यशैलीचे सखोल शिक्षण घेण्यासाठी केरळला गेल्या. त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना मोहिनीअट्टम शैलीत शास्त्रीय पद्धतीच्या अभाव जाणवल्याने त्यांनी त्यात संशोधन करण्याचे ठरविले. नाटय़शास्त्र, हस्तलक्षनंदीपिका आणि बालरामभरत यातील संहितेचा वापर करून त्यांनी नवीन पद्घती विकसित केली. जी आजही मोहिनीअट्टम नृत्यशैलीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देते.

मोहिनीअट्टम नृत्यशैलीच्या सखोल शिक्षण आणि संशोधनानंतर त्यांनी हे ज्ञान पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशाने १९७२ साली नालंदा नृत्य अकादमी सुरू केली. मात्र सुरुवातीच्या काळात या संस्थेला बऱ्याच टीकाटिप्पणीला समोरे जावे लागले. मात्र मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पाठिंब्यामुळे संस्थेच्या नृत्यविषयक पदव्यांना मान्यता मिळाली. १९७३ साली तीन विभागांमध्ये ‘नालंदा’ कार्यरत झाले. शालेय मुलांसाठी नालंदा नृत्यकला महाविद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त शैक्षणिक पदवी आणि शैक्षणिक स्तरावरील नृत्यातील मूलभूत संशोधनसाठी संशोधन संस्था अशा तीन स्तरांवर ‘नालंदा’ सध्या कार्यरत आहे. बॅचलर ऑफ फाइन आर्टस् (डान्स), मास्टर ऑफ फाइन आर्टस् (डान्स) आणि पीएच.डी. इन डान्स असे तीन प्रमुख अभ्यासक्रम नालंदा नृत्य कला महाविद्यालयात शिकविले जातात. माहिनीअट्टम, कथकली, भरतनाटय़म, कथ्थक अशा शास्त्रीय नृत्यशैलींचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाशी संलग्नित असलेले भारतातील पहिले नृत्य महाविद्यालय सुरू करण्याचा मान या संस्थेला जातो. तसेच या प्रशिक्षण संस्थेने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडून ‘शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था’ म्हणून ओळख मिळविली आहे. असा सन्मान मिळविणारी ‘नालंदा’ ही देशातील एकमेव संस्था आहे. २०१५ साली संस्थेने मास्टर ऑफ फाइन आर्टस् (मूव्हमेंट सायन्स) आणि महाराष्ट्र-गुजरात राज्यातील लोकनृत्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला.

नृत्यामधील बारकावे जाणून घेण्याबरोबरच त्याचे शास्त्र जाणून घेण्यासाठी विविध कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन संस्थेत केले जाते. विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे नृत्यशिक्षण मिळण्यासाठी २० नृत्यनिपुण शिक्षकांची नियुक्ती संस्थेत करण्यात आली आहे. नृत्यातील शिस्त, त्यासाठी आवश्यक मेहनत आणि त्यासाठी आवश्यक असणारी चिकाटी यांच्या माध्यमातून नृत्यकला आत्मसात करता येते, अशी शिकवण विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिली जाते. नृत्याचा प्रचार सर्वसामान्य वर्गापर्यंत करण्यासाठी या नृत्यकला महाविद्यालयाची निर्मिती झाल्याचे रेळे सांगतात. उच्च वर्गापर्यंत मर्यादित न राहता तळागाळातील खासकरून आदिवासी समाजातील मुलींना शास्त्रीय नृत्य शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न मी करत असून त्यात मला यश प्राप्त झाल्याचे त्या म्हणाल्या.