पुरावशेषांच्या तस्करीचीही भीती

नालासोपाऱ्याचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणारा सम्राट अशोकाचा शिलालेख हा सध्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असला तरी इतर पाच छोटेखानी शिलालेखांचा ठावच लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या शोधासाठी एक विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. याशिवाय या परिसरातील पुरावशेषांची संख्याही गेल्या काही वर्षांत कमी होताना दिसते आहे. त्यामुळे यामागे कुणा पुरावशेष तस्कराचा हात तर नाही ना, अशी भीती अभ्यासकांकडून व्यक्त होते आहे. त्यामुळेच किंबहुना या पुरावशेषांकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष द्यावे आणि महापालिकेच्या मदतीने नालासोपाऱ्यातच संग्रहालय उभे करावे, अशी मागणीही मूळ धरते आहे.

पं. भगवानलाल इंद्रजी यांनी १८८२ साली केलेल्या नालासोपाऱ्याच्या गवेषणामध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखाबरोबरच वकाला टेकडीवर पाच छोटेखानी शिलालेख सापडले होते. त्यामध्ये तीन महिलांची तर दोन पुरुषांची नावे होती. या स्तूपाशी संबंधित एक दंतकथा आहे. या दंतकथेनुसार भगवान गौतम बुद्ध सोपाऱ्याचा व्यापारी पूर्ण याच्या विनंतीवरून सोपाऱ्यात आले त्या वेळेस काही अंतरावर असलेल्या या टेकडीवर त्यांना सुमारे ५०० विधवा महिला भेटण्यासाठी आल्या. भगवान बुद्धांनी त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर, बुद्धांनीच प्रसादरूपाने दिलेले केस व नखे यांच्यावर त्या महिलांनी तिथे एक स्तूप उभारला आणि बकुळीचे झाड लावले. बकुळीला संस्कृतमध्ये वकाल म्हणतात. त्यामुळे या टेकडीला वकाला असे नाव पडले असावे. प्रत्यक्षात इंद्रजी यांनी १८८२ साली या ठिकाणाला भेट दिली त्या वेळेस तिथे स्तूप नव्हता. मात्र स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या बांधकामाचे अवशेष सापडले, त्या अवशेषांमध्येच हे पाच छोटेखानी शिलालेख होते. आज प्रत्यक्ष या ठिकाणास भेट दिल्यानंतर लक्षात येते की, इथे एक वस्तीच उभी राहिली आहे. त्या वस्तीतील समाजमंदिराच्या मागच्या बाजूस एका मोठय़ा मंदिराच्या अनेक पुरावशेषांचा खच पडून आहेत. त्यात तुटलेल्या शिल्पकृतींचा समावेश आहे. परिसरातील कुणी कधी तिथे येऊन त्यावर हळद-कुंकू वाहून हारही वाहून जातात. या परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन शोध घेतला असता त्या छोटेखानी शिलालेखांचा ठाव लागत नाही.

याचप्रमाणे प्राचीन गास तलावाच्या परिसरामध्येदेखील अशाच प्रकारे तीन ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पुरावशेषांचा खच पडलेला दिसतो. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी इथे पाहणीसाठी आले होते. या संदर्भात संपर्क साधला असता भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मुंबई सर्कलचे उपअधीक्षक बिपीन चंद्र नेगी म्हणाले की, एएसआयच्या अधिकाऱ्यांनी नालासोपाऱ्यास भेट दिली होती हे खरे आहे. सध्या केंद्र सरकारने सारे काही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एएसआयने संरक्षित म्हणून जाहीर केलेल्या वास्तूंच्या संदर्भात किती नेमकी किती जागा आहे, त्याची निश्चिती करण्यासाठीही ही भेट होती. त्यासाठी गास तलाव, बोळींज आणि नालासोपारा स्तूप परिसरास अधिकाऱ्यांनी भेट दिली. शिवाय भगवानलाल इंद्रजी यांनी केलेल्या उत्खननाच्या वेळेस सापडलेल्या बहुसंख्य पुरावस्तू ही मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये आहेत.