रसिका मुळ्ये

टाळेबंदी आणि करोनाच्या धास्तीने दुरावलेल्या खाद्ययात्रींना आकर्षित करून घेण्यासाठी सर्वच बडय़ा हॉटेल व्यावसायिकांनी युक्ती लढविली असून आरोग्यदायी खाद्यपदार्थाची हमी त्यांच्या पदार्थसारणीतून (मेन्यू कार्ड) दिसून येत आहे. ‘कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत’ऐवजी आता व्यंजनांपुढे ‘आरोग्यदायी’, ‘रोगप्रतिकारक्षम’ असे पदार्थाचे नवे बारसे झाले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी नागरिकांमध्ये निर्माण झालेली सजगता नाक्यावरील मिठाईवाल्यापासून ते नामांकित कॅफे, पंचतारांकित हॉटेल्सनी लक्षात घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलमधील पदार्थाच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

देशभर जाळे असलेल्या फासोस, लंच बॉक्स, द गुड बोल, सिक्वेल, बुसॅगो, ऑल गुड डेली अशा अनेक कॅफेजनी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थाचा समावेश केला आहे. ऑबेरॉय हॉटेल्सनीही त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात तज्ज्ञ शेफकडून रोगप्रतिकारशक्तिवर्धक नव्या पदार्थाचा समावेश करण्यात आला असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. हव्या त्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या अ‍ॅपआधारित सेवांनीही पदार्थ निवडीसाठी ‘हेल्थ हब’सारखा पर्याय दिला आहे.

‘सध्या पूर्वीचे सर्व पदार्थ उपलब्ध करून देता येत नाहीत. मात्र अ‍ॅण्टिऑक्सिडंट, इम्युनिटी बूस्टर ज्यूस आणि पदार्थाचे पर्याय आम्ही दिले आहेत. ‘ऑरगॅनिक कॉफी’ हे आमचे वैशिष्टय़ आहे. या पदार्थाना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे परळ येथील ‘ऑल गुड डेली’चे व्यवस्थापक समीप यांनी सांगितले. ‘छोले, पनीरचे पदार्थ हे नेहमीचेच असले तरी त्यात काही बदल केले असून ‘इम्युनिटी बूस्टर’ पदार्थामधील सर्व घटक सेंद्रीय असतात. कमी उष्मांक राहील अशी काळजी घेण्यात येते,’ असे फासोसच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले.

केलेले बदल..

छोले आणि कुलचा, फलाफेल राईस, सरबते, स्मूदीज, मोमोज आता ‘इम्युनिटी बूस्टर झाले आहेत. काही कॅफे आणि रेस्टॉरंट्स अशा खाद्यपदार्थाची स्वतंत्र यादी देत आहेत. काहींनी आपल्या पदार्थसारणीत  हळद दूध, उकाळाही समाविष्ट केला आहे. पदार्थामधील आले, जिरे, ओवा अशा वर्षांनुवर्षे वापरण्यात येणाऱ्या पदार्थाचे आता आवर्जून उल्लेख करण्यात येत आहेत. पदार्थातील प्रथिने, जीवनसत्त्वांचे प्रमाण यांचाही तपशील दिला जात आहे.

कारण काय?

टाळेबंदीचा फटका हॉटेल्सना मोठय़ा प्रमाणावर बसला. हॉटेल्स सुरू झाल्यानंतरही अनेक महिने नागरिक भीतीने घरातील खाण्यालाच पसंती देत होते. हॉटेलमधील खाद्यपदार्थाबाबत असलेली भीती दूर करण्यासाठी पदार्थसारणीमध्ये ‘क्रंची’, ‘स्पायसी’ यांऐवजी ‘इम्युनिटी बूस्टर, न्यूट्रिशिअस’ या बिरुदावली समाविष्ट झाल्या.