माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयच नव्हे, तर प्रकरणाच्या व्याप्तीनुसार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व अन्य यंत्रणाही तपास करतील, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा वापर करणारे (हॅण्डलर) अजून मोकळे असून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याप्रकरणी आणखीही काही नावे तपासानंतर उजेडात येतील, असे भाकीतही फडणवीस यांनी केले.

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा उशिरा आल्याची टिप्पणी करीत शरद पवार यांनी देशमुख यांची उगाच पाठराखण केली. वाझेची भेट नाकारताना देशमुख विलगीकरणात होते, असा पवारांचा दावा देशमुख यांच्या पत्रकार परिषदेच्या ध्वनिचित्रफितीचे पुरावे उपलब्ध झाल्याने खोटा ठरला होता. अशी वेळ पवारांसारख्या किंवा कोणत्याही नेत्यावर येऊ नये, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणीवसुलीचे काम दिल्याच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर कोणताही पक्ष किंवा व्यक्ती आमचे लक्ष्य नसल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब झाली असून ती प्रतिष्ठा पुन्हा मिळावी, असे आमचे प्रयत्न आहेत. देशमुखप्रकरणी माझ्याकडे बरीच माहिती आहे. देशमुखांना अटक होईल का, याविषयी मला काही माहीत नाही, हा तपासाचा भाग आहे. पण माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार तपासात अनेकांची नावे पुढे येतील.

उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्याने देशमुख यांना गृहमंत्रिपदी ठेवणे शक्यच नव्हते व अन्य पर्याय न उरल्याने देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काही नैतिकता शिल्लक आहे का, असा सवाल करीत फडणवीस यांनी ‘पोलीस आयुक्तांनी थेट गृहमंत्र्यांवर खंडणीवसुलीचे आरोप केल्यावर व उच्च न्यायालयाने सीबीआयकडे चौकशी दिल्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मौन का पाळून आहेत, हे कोडेच असल्याचे नमूद केले.

कायदेशीर पुरावे असल्याखेरीज मी कोणावरही निष्कारण आरोप करीत नाही, असे सांगून संजय राठोड प्रकरणातही पोलीस तपास योग्यप्रकारे होत नसल्याने ते प्रकरणही सीबीआयकडे दिले जाण्याची शक्यता फडणवीस यांनी व्यक्त केली.