News Flash

निर्भीडपणे बोला ! नाना पाटेकर यांचे युवा पिढीला आवाहन

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

भिनेते नाना पाटेकर

सभोवतालच्या सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपण गप्प न राहता स्पष्ट आणि निर्भीडपण बोलणे, व्यक्त होणे गरजेचे आहे. गप्प राहिल्याने मग सगळेच आपल्या माथी येते आणि आपण मुकाट सहन करत राहतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी दुसरा कोणीतरी येईल, याची वाट न पाहता आपले सूर्य आपणच व्हा, किरणांची अपेक्षा करू नका, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी येथे केले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

भावी वक्ते घडविण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून महाअंतिम फेरीतील स्पर्धकांची भाषणे ऐकण्यासाठी इतक्या मोठय़ा संख्येने श्रोते आल्याबद्दल नाना यांनी त्यांचेही कौतुक केले आणि सर्व स्पर्धकांनी त्यांना दिलेल्या विषयावर निर्भीडपणे जे विचार मांडले त्याबद्दल त्या सर्वाचेही खास अभिनंदन केले.

जगज्जेता सिकंदराच्या एका गोष्टीचा हवाला देत नाना म्हणाले, एकदा सिकंदर घोडय़ावरून जात असताना वाटेत त्याला एक वृद्ध माणूस रस्त्यात बसलेला दिसला. सिकंदराने त्याला काय हवे ते माग, असे सांगितले. त्या वृद्धाला तो सिकंदर आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे तो वृद्ध सिकंदराला म्हणाला, ‘‘जरा बाजूला होता का, तुम्ही वाटेत उभे राहिल्यामुळे मी जे ऊन खात आहे ते अडले आहे, आमच्या वाटय़ाचे ऊन तरी घेऊ नका,’’ असे सांगून नाना म्हणाले, सरकार किंवा व्यवस्था काहीतरी करील, असा विचार न करता आपल्या विभागात पडलेला एकतरी खड्डा आपणच बुजवा. समाजात आजूबाजूला खूप मोठी भगदाडे पडली असून ती बुजविण्यासाठी आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. आमचे ‘नाम फाऊंडेशन’चे काम याच उद्देशातून सुरू झाले आहे.

व्यासपीठावरून भाषण करताना घाबरू नका. तुमचे विचार न घाबरता मांडा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाषण कधीही पाठांतर करून करू नका, तर भाषणातील मुद्दे लक्षात ठेवा. म्हणजे मग पुढे विचार आणि भाषण आपोआप सुरू राहील. शब्द महत्त्वाचे नाहीत तर तुम्ही जे बोलाल ते आतून येणे आवश्यक आहे. आपल्याला काय आणि कशासाठी म्हणायचे आहे, ते लक्षात आले की पुढील सगळे सहजसोपे होते, असेही नाना म्हणाले. तुम्ही आता स्पर्धेसाठी जसे निर्भीडपणे बोललात तसेच पुढील आयुष्यातही तुमचे मत आणि विचार असेच निर्भयपणे मांडा, असा सल्लाही नाना यांनी सर्व स्पर्धकांना दिला.

मला नग्न सत्य बोलायला आवडते आणि कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता मी ते बोलत असतो. आज सर्वच स्पर्धकही खूप निर्भयपणे बोलले. राजकारण्यांची नावे घेऊन त्यांनी आपले परखड विचार मांडले.  भाषण सादर करताना विचार महत्त्वाचा, आवाज नाही.

      – नाना पाटेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 4:07 am

Web Title: nana patekar appeal younger generation to speak boldly
Next Stories
1 परळ स्थानकातील कामासाठी आज आठ तासांचा ब्लॉक
2 युवा वक्त्यांच्या भाषणात अनेक मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श
3 ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’कडे शिवसेनेची पाठ
Just Now!
X