16 December 2017

News Flash

‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनाचे अतिथी संपादक नाना पाटेकर

‘लोकमान्य लोकशक्ती’ असे सार्थ घोषवाक्य मिरवणाऱ्या, ते सत्यात उतरवणाऱ्या आणि त्याच्याशी प्रामाणिक राहून गेली

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 6, 2013 3:59 AM

‘लोकमान्य लोकशक्ती’ असे सार्थ घोषवाक्य मिरवणाऱ्या, ते सत्यात उतरवणाऱ्या आणि त्याच्याशी प्रामाणिक राहून गेली सहाहून अधिक दशके निर्भीड आणि नि:पक्ष पत्रकारिता करणाऱ्या दैनिक ‘लोकसत्ता’चा वर्धापनदिन रविवार, १३ जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यादिवशीचे लोकसत्ताच्या अंकाचे आहेत अतिथी संपादक मराठी-हिंदीतील ‘दादा’ अभिनेते नाना पाटेकर.
अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराची चर्चा सातत्याने होते, पण भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मात्र सातत्य दिसत नाही. ते का, या नानांच्या कल्पनेतून उतरलेल्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर वर्धापनदिनाचा अंक असेल. राजकारण, समाजकारण, प्रशासन, न्यायालये, आरोग्य अशा अनेक क्षेत्राला ग्रासून राहिलेल्या भ्रष्टाचाराच्या स्वरूपाची नुसती ‘तीच ती’ चर्चा करण्याऐवजी या क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम करणारे, अभ्यास-संशोधन करणारे मान्यवर लेखक भ्रष्टाचाराला कशा प्रकारे आळा घालता येईल, याबाबत काही ठोस उपाययोजनाही सुचवणार आहेत.
राजकारण (प्रा. राजेश्वरी देशपांडे), न्यायालये (न्या. विकास सिरपूरकर), आरोग्य (डॉ. रवी बापट), समाजकारण (कुमार शिराळकर) असे विविध मान्यवर त्या त्या क्षेत्रावर क्ष-किरण टाकतील. याशिवाय नाना पाटेकर यांचा व्यक्ती, समाज आणि व्यवस्था यांचा परखड समाचार घेणारा दणदणीत लेख आणि त्यांची तितकीच सडतोड मुलाखतही या अंकाचे खास आकर्षण असेल. तेव्हा वर्धापन दिनाच्या या विशेषांकाची प्रत आजच राखून ठेवा.

First Published on January 6, 2013 3:59 am

Web Title: nana patekar become guest editor on occasion of loksatta anniversary