पिकाचे नुकसान झाल्याने सरकारकडून मिळणारी अनुदानाची अर्धवट रक्कम पदरात पडल्याने नांदेडमधील एका शेतकऱ्याने मुंबईतील नवीन प्रशासकीय भवनासमोर बुधवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून येथील माधव कदम या तरुण शेतकऱ्याने विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नरिमन पॉइंट येथील नवीन प्रशासकीय भवनासमोर कीटकनाशक प्राशन करून बुधवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ‘क्लोरिफायरोफॉस’ हे कीटकनाशक त्याने प्राशन केले होते. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिकाचे नुकसान झाल्यामुळे सरकारी अनुदान पूर्ण न मिळाल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. त्याच्या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी सरकारकडून प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये माधव कदम याला मिळणार होते. मात्र, अवघे ४,४०० रुपये मिळाल्याने नैराश्याने तो ग्रासला होता. त्यामुळेच आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना उपचारावेळी दिलेल्या जबाबात सांगितले. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान माधव कदम यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव नांदेड येथील त्यांच्या गावी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याआधीही कमद याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.