प्रादेशिक पक्षांची पीछेहाट; अशोक चव्हाण यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली पराभवाची मालिका खंडित होऊन नांदेडमध्ये मिळालेल्या निर्विवाद यशाने राज्यात काँग्रेसला नैतिक बळ लाभले आहे. या विजयाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन पक्षात वाढले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला अजूनही सूर गवसलेला नाही. राज्यात भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत होत असल्याने शिवसेना किंवा राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांची पीछेहाट होऊ लागली आहे.

या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. नांदेड, सिंधुदुर्ग आणि नगर या तीन जिल्ह्य़ांमध्येच पक्षाला चांगले यश मिळाले होते. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशाने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. भिवंडी, मालेगाव आणि परभणी या तीन महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या सत्तेने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. नांदेडमध्ये मिळालेल्या एकतर्फी विजयाने काँग्रेसच्या मनोधैर्य नक्कीच उंचावणार आहे. सातत्याने होणाऱ्या पराभवांच्या पाश्र्वभूमीवर नांदेडचा विजय काँग्रेसला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीपासून मुस्लीम समाज काँग्रेसपासून दूर गेला होता. भिवंडी, मालेगाव, परभणीपाठोपाठ नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने साथ दिल्याने काँग्रेससाठी तेवढीच समाधानाची बाब ठरली आहे. नांदेडमध्ये दलित समाजाचाही काँग्रेसला पाठिंबा मिळाला. हाच कल पुढील निवडणुकांमध्ये कायम राहील, असा काँग्रेसला विश्वास आहे.

नांदेडच्या विजयाने अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन नक्कीच वाढले आहे. नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा एक ओळीचा ठराव बुधवारी रात्रीच करण्यात आला. नवा अध्यक्ष नेमताना मराठा समाजाकडेच हे पद कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास अशोकरावांकडेच हे पद कायम राहू शकते. अशोकरावांच्या शब्दाला दिल्ली दरबारी वजन आले आहे.

राष्ट्रवादीची घसरण

पुणे, पिंपरी-चिंचवड, परभणीची सत्ता गमाविणाऱ्या राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका अद्यापही खंडित झालेली नाही. नांदेडमध्ये गेल्या वेळी १० नगरसेवक निवडून आले होते. यंदा भोपळाही फोडता आलेला नाही. महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फार काही चांगले यश मिळाले नव्हते. गेल्याच महिन्यात झालेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. परभणीत सत्ता गमवावी लागली. राष्ट्रवादीबद्दल जनतेच्या मनात विश्वासार्हता राहिलेली नाही हेच निकालांवरून स्पष्ट होते.

भाजपचे डोळे आता तरी उघडतील – मोहन प्रकाश

नांदेडमध्ये मिळालेले घवघवीत यश तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश यातून भाजपचे डोळे आता तरी उघडतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.

शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा

राज्यातील राजकीय चित्र बघितल्यास भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच मुख्यत्वे लढती होत आहेत. शिवसेनेला मुंबई व ठाण्याबाहेर यश मिळाले नाही. राष्ट्रवादीची पीछेहाट होत आहे. भाजपने गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या चढत्या आलेखाने शिवसेनेचे नुकसान होत आहे.