पोदार महाविद्यालयाचा निराधार मुलांसाठी कार्यक्रम

माटुंगा येथील पोदार महाविद्यालयाच्या अमृत महोत्वानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत आयोजित केलेला ‘उत्तुंग २०१५, नन्हे कदम उची उडान’ महोत्सव उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आकर्षक सजावट केली होती. यात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत जिराफासह विविध प्राणी, कार्टून्स, विविध वृक्षांचे चित्रमय देखावे उभे करण्यात आले होते. ही  सर्व सजावट टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित होती.  तळागाळातील २०० निराधार मुले या महोत्सवात सहभागी झाली होती.  पेस्टल दी पोस्टर, झिरो स्ट्रीट ओ मॅनिक, फस्त्रोग्राफी स्क्रीब ओ ब्लबर यांसारखे विविध मनोरंजनात्मक अंतर्गत खेळ या वेळी आयोजित करण्यात आले होते. शीनचान रेस क्रिकेट, डॉग ऑन द बोन, फुटबॉल टग ऑफ वॉर यांसारख्या मैदानी खेळांचाही मुलांनी आनंद घेतला. या मुलांबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थीही उत्साहात सहभागी झाले होते. या वेळी प्राचार्य शोभना वासुदेवन व इतर प्राध्यापकांच्या हस्ते मुलांना शालेय आणि इतर भेटवस्तू देण्यात आल्या.  महाविद्यालयीन स्पधार्र्मध्ये विजेत्या ठरलेल्या ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अशोक कुलकर्णी व तेजस्वी पाटील या कलाकारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक कपिल इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायली भिवापुरकर, अभिषेक प्रताप सिंघ, भाग्यश्री माने, स्नेहल कासारे, ओमकार तांबडे, सागर सावंत आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.