दोन वर्षांपासून इमारतीत प्रवेशबंदी; उपकरणेही पडून

मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमांमध्ये काळानुसार बदल करत अनेक नवीन विभागांची स्थापना करण्यात आली. यापैकीच एक म्हणजे नॅनोविज्ञान व नॅनोतंत्रज्ञान विभाग. या विभागाची भव्य इमारत विद्यापीठाच्या कालिना संकुलात उभी असून तेथे गेल्या दोन वर्षांपासून प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विभागातील उपकरणेही वापराविना पडून आहेत. या विभागाची इमारत उभी करण्यासाठी निधी मिळाला होता, मात्र हा विभाग चालविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे खुद्द कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय तंत्रज्ञानापासून ते मोबाइलच्या सिम कार्डपर्यंत सर्वत्र नॅनोतंत्रज्ञानाचा आणि नॅनोविज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे या विषयातील अभ्यासक्रम देण्यास मुंबई विद्यापीठ मागे राहू नये या उद्देशाने विद्यापीठात सहा वर्षांपूर्वी नॅनोविज्ञान आणि नॅनोतंत्रज्ञान विभाग सुरू करण्यात आला. या विभागाची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात एक भव्य इमारत उभी करण्यात आली. विभागाची धुरा सांभाळण्यासाठी आयआयटी कानपूर येथील प्राध्यापक डॉ. मनोहरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय अडचणींना कंटाळून डॉ. मनोहरन यांनी २०१४ मध्ये विभागाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर या विभागाला पूर्णवेळ विभागप्रमुखही नेमण्यात आला नाही. या विभागात चार प्राध्यापकांची रीतसर कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ती नियुक्ती कालांतराने तात्पुरती करण्यात आली आणि तात्पुरती नियुक्ती असलेल्या प्राध्यापकांना पीएच.डी.चे विद्यार्थी घेता येत नाही असे कारण देत विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत विभागाची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. दरम्यान, नियुक्ती घोळाबाबत प्राध्यापकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. कालिना संकुलात उभ्या असलेल्या या विभागात कोटय़वधी रुपये खर्चून अत्याधुनिक उपकरणेही खरेदी करण्यात आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश उपकरणे ही वापराविना पडून आहेत. विभाग इतर सर्व सुविधांनी सज्ज असतानाही केवळ प्रशासन हट्टामुळे विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येऊ शकत नाही. या सर्वाबाबत कुलगुरू डॉ. देशमुख यांना विचारले असता विद्यापीठ अनुदान आयोगाने इमारत बांधण्यासाठी १०० कोटींचा निधी दिला होता. तो खर्च झाला आहे. आता विभागाचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. विभागात सध्या काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र प्राध्यापकांची कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने पीएच.डी. आणि एमफीलचे विद्यार्थी घेता येऊ शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. विभाग चालविण्याकरिता निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

संकेतस्थळही कालबाह्य़

या विभागाचे संकेतस्थळही अद्ययावत करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून नॅनोविज्ञान विभागाच्या संकेतस्थळाला भेट दिली असता पीएच.डी. आणि एमफिल प्रवेशप्रक्रियेपुढे नवीन माहिती असे दाखविले असले तरी प्रत्यक्षात त्यावर क्लिक केल्यावर ‘नॉट फाऊंड’ असा संदेश येतो. संकेतस्थळावर शिक्षकांची,  संचालकांची, ग्रंथालयाची, संशोधनांची माहिती  नाही.