News Flash

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील

भाजप नेत्यांवर आपल्या उमेदवारीवरून काही बंधने आली असावीत.

राणे यांचा आशावाद कायम

विधान परिषदेची पोटनिवडणूक आपण दिलेल्या राजीनाम्यामुळे होत आहे. या जागेवर आपलाच हक्क होता. पण भाजप नेत्यांवर आपल्या उमेदवारीवरून काही बंधने आली असावीत. उमेदवारी नाकारली तरी आपण नाराज नाही. आज नाही तर उद्या आमदार होईनच, पण त्याचबरोबर भाजपला पाठिंबा देताना मंत्रिपदाचा दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळतील, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने राणे अस्वस्थ होणे साहजिकच आहे. या संदर्भात त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसमध्ये कोंडी झाल्याने बाहेर पडलात. स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपला पाठिंबा दिलात. पण भाजपने विधान परिषदेसाठी पाठिंबा देण्याचे टाळून आपल्यावर अन्याय केला असे वाटत नाही का?

भाजप नेत्यांच्या सल्ल्यानुसारच स्वतंत्र पक्षाची स्थापना करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला. आपल्याला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. आपली बाजू स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रविवारी रात्री आपली सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या काही अडचणी त्यांनी आपल्या समोर मांडल्या. गुजरात निवडणुकीची किनार होती. भाजपला अडचणीत आणण्याची आपली भूमिका नाही. शेवटी भाजपच्या पाठिंब्यावरच निवडणूक लढवायची होती.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्र्यांनी आपल्याला थांबण्याचा सल्ला दिला का?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले असते तरीही काहीही फरक पडला नसता. शिवसेनेचे अनेक आमदार आपल्या संपर्कात होते. राणे विरुद्ध सारे अशी लढत झाली असती तरी आपण १५ मतांच्या फरकाने सहज निवडून आलो असतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपल्याला दूरध्वनी करून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. २००६ मध्ये काँग्रेसकडे मते शिल्लक नसताना राजन तेली यांना २८ मते घेऊन निवडून आणले होते. आपल्याला बाहेरची मते मिळण्यात काहीच अडचण आली नसती. पण शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा होता. त्यांनी थांबण्याचा सल्ला दिल्याने लढलो नाही.

शिवसेनेने विरोध केल्याने भाजपने आपल्याला पाठिंबा दिला नाही, याबाबत तुमची भूमिका काय?

सत्तेला लाथ मारण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची लाथ गेली कुठे? आपण रिंगणात असतो तर शिवसेनेचेच आमदार फुटले असते. शिवसेनेत आता निष्ठा वगैरे काहीही उरलेले नाही. शिवसेनेचे आमदार माझ्याशी संपर्क साधत होते. शिवसेनेला त्यांची मते फुटण्याची अधिक भीती होती. ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात जाऊन काय दिवे लावले हे समोर आहेच. आता आपण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहोत.

मंत्रिपदाच्या आश्वासनाचे काय झाले, मुख्यमंत्र्यांबरोबर या संदर्भात चर्चा झाली का?

भाजपला पाठिंबा देतानाच आपल्याला मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा शब्द पाळला जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले असल्याने मला आमदारकीबाबत काही नवीन नाही. आज नाही तर उद्या मी आमदार होईन. मला मंत्रिपदाचा दिलेला शब्द आजही कायम आहे. हा शब्द नक्कीच पाळला जाईल. काँग्रेसने शब्द पाळला नाही, पण भाजप शब्द पाळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:28 am

Web Title: narayan ran maharashtra legislative council cm devendra fadnavis
Next Stories
1 मार खाल्ला तर पदावरून काढेन!
2 माधव भांडारी आता ‘संभाव्य’ यादीत!
3 भाजपचे लाड २१० कोटींचे मालक
Just Now!
X