काँग्रेसमध्ये हायकमांड हसल्यावर अन्य नेत्यांनाही हसावे लागते, पण नेमका या गुणाचा अभाव असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नारायण राणे यांचे नुकसानच झाले, असा चिमटा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काढला. तर ‘काँग्रेसचे नेतृत्व फार धूर्त आहे. एखाद्याला छळल्यावर वा त्रास दिल्यावरही पद दिले जाते व त्याचे मूर्तिमंत उदाहरण मी स्वत: आहे, अशी कबुली देत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राणे या परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याने त्यांनी काँग्रेस सोडू नये’, असा सल्ला दिला. यावर भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल कोणतेही भाष्य करण्याचे टाळून राणे यांनीही संदिग्धता कायम ठेवली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाटय़मंदिरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री जयंत पाटील अशा काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राणे काँग्रेसला रामराम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करणार या चर्चेचे सावट या समारंभावर होते. ‘राणे यांनी शिवसेना सोडून चूकच केली. त्यांनी शिवसेना सोडू नये म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी आगीतून फुफाटय़ात उडी घेतल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते’, असे मतही गडकरी यांनी मांडले.

राणे इकडे चालले, तिकडे चालले, असे रोज ऐकायला मिळते, पण राणे हे द्रष्टे नेते असून, कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात. यामुळे ते वेडावाकडा विचार करणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. कोण काय करते याकडे काँग्रेस नेतृत्वाचे फार बारीक लक्ष असते. २००४ मध्ये राज्यात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळूवन दिली तरी मला आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी पाठविण्यात आले. बरोबर एक वर्ष, एक महिन्याने आपल्याला दिल्लीत पाचारण करून केंद्रात ऊर्जा हे महत्त्वाते खाते देण्यात आले. पुढे गृह खाते आणि लोकसभेचे नेतेपदही सोपविण्यात आले. तेव्हा माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, असा सल्ला सुशीलकुमारांनी राणे यांना दिला. स्पष्टवक्तेपणामुळेच बहुधा राणे यांची काँग्रेस पक्षात कुचंबणा होत असावी, असा टोला माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. सत्तेत असो वा नसो, राणे यांचा रुबाब कायम असतो. हा रुबाब असाच ठेवा, अशी भावना रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांमुळेच मी महाराष्ट्राला दिसलो : राणे

१९९०च्या दशकात मुंबईचे महापौर होण्याची माझी इच्छा होती, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला मालवणमध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगितले. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व मंत्री जी काही पदे मिळाली किंवा महाराष्ट्रासमोर नारायण राणे दिसला ते सारे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शक्य झाले, अशी कृतज्ञता राणे यांनी व्यक्त केली. मात्र, राणे यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. गेले १५ दिवस आपल्याबद्दल विविध वावडय़ा उठत आहेत. मी कुठे आहे, असे मला विचारण्यात येते. त्यावर मी सध्या रवींद्र नाटय़मंदिरात आहे, असे सांगत राणे यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल किंवा काँग्रेसमध्येच राहणार याबाबत काहीच भाष्य केले नाही.