भाजपचा स्वतंत्र विदर्भ निर्मितीचा डाव; नारायण राणे यांचा हल्ला

‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असले तरी ‘मी अखंड महाराष्ट्राचा भविष्यातही मुख्यमंत्री राहीन’, असे स्पष्ट करायला पाहिजे होते. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे असून मुख्यमंत्र्यांनीही या मुद्दय़ावर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केला. विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा अखंड महाराष्ट्राला विरोध असला तरी त्यांची समजूत काढण्याबरोबरच काँग्रेस पक्षाला भूमिका बदलण्याची विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.

स्वतंत्र विदर्भ निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. पण मुख्यमंत्र्यांनी तसे कोणतेही विधान केले नाही. योग्य वेळी स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेऊ, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. अखंड महाराष्ट्र कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन नाही तसेच दानवे यांचे विधान यावरून स्वतंत्र विदर्भ निर्मितीचा भाजपचा डाव असल्याचे सिद्ध होते, अशी टीका राणे यांनी केली.

विदर्भातील काँग्रेस नेते स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने

मुंबई : अखंड महाराष्ट्र विरुद्ध स्वतंत्र विदर्भ या वादात काँग्रेसच्या नेत्यांनी अखंड महाराष्ट्राच्या बाजूने पुढाकार घेतला असला तरी वर्षांनुवर्षे विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाचे समर्थन केले आहे. स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने विदर्भातील नेत्यांना नेहमीच उभे राहावे लागले. विदर्भात हा मुद्दा फारसा प्रभावी ठरलेला नसला तरी भावनिक मुद्दय़ावर स्थानिक नेत्यांना विरोधी भूमिका घेता आलेली नाही. भाजपने नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने भूमिका मांडली. अशा वेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विरोध करणे शक्य झाले नाही.

भाजपला एकहाती सत्ता मिळेपर्यंत विदर्भ अशक्य

नागपूर : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी राज्यात पक्षाला एकहाती बहुमत मिळेपर्यंत स्वतंत्र विदर्भ देणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले.

राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे सरकार असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका मांडली, ती योग्य असल्याचे सांगत मुरलीधर राव म्हणाले, राज्यात ज्यावेळी विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळी दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. आम्ही त्यावेळी बहुमत मागितले होते आणि त्यात भाजपला बहुमत मिळाले तर विदर्भ देऊ अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती मात्र, बहुमत मिळाले नसल्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आहे, त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात निर्णय घेणे शक्य नाही. ज्यावेळी भाजपाला राज्यात बहुमत मिळेल त्यावेळी विदर्भ म्हणून छोटय़ा राज्याचा विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.