लोकसभा निवडणुकीत मुलाचा तर विधानसभेत स्वत:च्या पराभवामुळे वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरताना नारायण राणे अधिक सावध झाले असून, राष्ट्रवादीची मदत व्हावी यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ वाढू नये हा राष्ट्रवादीचा प्रयत्न असताना तसेच राणे आणि राष्ट्रवादीचे संबंध लक्षात घेता राष्ट्रवादीकडून तोंडदेखली मदत केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राणे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुमारे १० हजार मते मिळाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राणे यांनी सर्वाना बरोबर घेण्यावर भर दिला आहे. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली तेव्हाही कृपाशंकर सिंह, नसीम खान आदी काँग्रेस नेत्यांना बरोबर घेतले होते. या पोटनिवडणुकीसाठी राणे उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादी गणित बिघडू देणार?
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे लक्ष्य आता विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यावर आहे. दोघांमध्ये फक्त एकाचा फरक आहे. विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा कायम आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने छोटय़ा पक्षांच्या पाठिंब्याच्या आधारे या पदावर दावा केला आहे. काँग्रेसचे संख्याबळ आणखी एकाने वाढल्यास राष्ट्रवादीचे गणित बिघडू शकते.

राष्ट्रवादीची राणे यांच्यावर कायम कुरघोडी
*राणे यांचे प्रस्थ वाढू नये, असा राष्ट्रवादीचा कायमच प्रयत्न राहिला आहे. राणे यांची कोंडी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले.
*लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी असतानाही राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला नाही, असे विधान राणे यांनीच केले होते.
*कोकणात राणे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले. नगरपालिका निवडणुकीत तर राणे समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला होता.
*ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता राष्ट्रवादी राणे यांना कितपत मदत करेल याबाबत साशंकच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील संबंधात कटुता आली आहे.
*राष्ट्रवादी आणि भाजपची  जवळीक वाढल्याचा आरोप राज्य काँग्रेसमधील साऱ्या नेत्यांनी केला होता.

तासगावमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली. तसेच तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा घोषित केला.

तासगावची निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे
तासगाव-कवठे महांकाळ पोटनिवडणुकीसाठी आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना विरोध न करण्याचा निर्णय रविवारी भाजपच्या उमेदवारीसाठी दावा करणारे अजितराव घोरपडे यांनी जाहीर केला. घोरपडे यांच्या या निर्णयामुळे तासगावची निवडणूक आता राष्ट्रवादीसाठी एकतर्फी झाली असून, पाटील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.