* १ सप्टेंबरपासून राज्यात काँग्रेसच्या प्रचाराला सुरूवात होणार
लोकसभा निवडणुकीच्यावेळी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागाईच्या मुद्द्यावरून देशाला फसवले असल्याची टीका काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी केली. ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या सुरुवातीची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
येत्या १ सप्टेंबर रोजी हुतात्मा चौकातून काँग्रेसच्या प्रचाराला सुरूवात करणार असल्याची घोषणा राणेंनी केली. अखंड महाराष्ट्रासाठी आपले प्राण वेचलेल्या १०५ हुतात्म्यांचे स्मरूण करून हाती मशाल घेऊन हुतात्मा चौकातून विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ वाढविणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात काँग्रेसने केलेल्या विकासकामांच्या आधारावर प्रचार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या नेतृत्वात राज्यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी-सुविधा, मेट्रो, मोनो रेल्वेसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, उड्डाणपूल आणि सुसज्ज रुग्णालये या विकासकामांच्या आधारावर राज्यात प्रचार करण्यात येईल. गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विचारणारे नरेंद्र मोदी सध्या काँग्रेसनेच केलेल्या कामांची उदघाटने करीत आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.
स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य देण्याची भूमिका ठेवणाऱया भाजप पक्षाने यावेळी अर्थसंकल्पात संरक्षण खात्यात ४९ टक्क्यांपर्यंत परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आणि काँग्रेस सत्तेत असताना किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला यांनीच विरोध केला होता. अशाप्रकारे भाजप हा सत्तेत आल्यानंतर रंग बदलणारा पक्ष असल्याचेही टीकास्त्र नारायण राणेंनी यावेळी केले. सोबत देशाचे पंतप्रधान म्हणून जसा आम्ही नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. त्याचप्रमाणे शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही सन्मान व्हायला हवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पवित्राही राणेंनी यावेळी घेतला.