सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर पहिलं विमान उतरून काही तासही झालेले नाहीत तोवर यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. परंतु, केसरकर यांनी राणेंचा आरोप फेटाळला असून डीजीसीएने परवानगी दिल्यानंतरच हे विमान उतरवल्याचा दावा केला.

बाप्पा पावले ! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर उतरलं पहिलं विमान

सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर चेन्नईहून उड्डाण केलेलं विमान सकाळी उतरलं होतं. चेन्नईवरुन उड्डाण केलेलं विमान गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झालं. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचं आगमन झालं. चाचणीसाठी हे विमान उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, डीजीसीएची परवानगी नसताना हे विमान कसं उतरवण्यात आलं, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनीही केसरकरांवर टीकास्त्र सोडले. विमानतळाच्या सुरक्षिततेचे कोणतेही मानक पूर्ण करण्यात आलेले नाही. विमानतळासाठी ६२ एनओसीची गरज असते. यातील अवघ्या २५ टक्के एनओसींची पूर्तता करण्यात आली. फक्त एक खासगी विमान विमानतळावर उतरवण्यात आले. यासाठी ना सरकारची ना डीजीसीएची परवानगी होती, असे नितेश राणे म्हणाले.

चमकोगिरी करण्याच्या नादात गणरायाचा अपमान झाल्याचाही त्यांनी आरोप केला. गणरायाची मूर्ती विमानाच्या लगेजसाठी असलेल्या भागात ठेवून आणले होते. गणरायाचा अपमान करणाऱ्या केसरकरांचा निषेध करत असल्याचे नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, रस्ते बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या आय.आर.बी. कंपनीला (आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि.) बांधा वापरा व हस्तांतरण करा या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यासाठी सन २००९ मध्ये करार करण्यात आला होता. एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प त्यावेळी १७५ कोटीचा होता. नंतर ३८० कोटीच्या घरात पोहोचला होता.