शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून राज्यातील सामाजिक अभिसरणाला पद्धतशीरपणे सुरुंग लावण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून सुरू झाले आहेत. शिवशाहिरांचे जागोजागी सत्कार व्हावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार वितरण समारंभात केले असतानाच शिवाजी महाराजांबद्दल पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणावरून मराठा आणि बहुजन समाजात संतप्त भावना असल्याने हे सत्कार पिंजऱ्यातच करावे लागतील, असा इशारा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. राणे यांच्या भूमिकेवरून सत्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा जातीय वाद किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या विरोधात आतापर्यंत राष्ट्रवादीची मंडळी आघाडीवर होती. आता राणे यांनी या वादात उडी घेतल्याने पुरस्कार वितरणानंतरही त्याचे कवित्व कायम राहणार आहे. अर्थात, राणे यांच्या या भूमिकेला काँग्रेस पक्षाचा कितपत पाठिंबा मिळतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे. बहुजन समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही जिवापेक्षा प्यारी आहे. यामुळेच शिवाजी महाराजांची बदनामी करणारे लिखाण केलेल्या पुरंदरे यांच्याबद्दल मराठा आणि बहुजन समाजात संतप्त भावना आहे. त्याचे पडसाद नक्कीच उमटतील, असेही राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

शिवशाहिरांचे जंगी स्वागत

पुणे: बाबासाहेब पुरंदरे यांचे गुरुवारी  पुण्यनगरीत आगमन झाले आणि शिवशाहिरांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पुरंदरे वाडय़ावर येण्यापूर्वी पुरंदरे यांच्या हस्ते गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली.