कोकण आणि मुंबई या लागोपाठ दोन पराभवानंतरही मागील दाराने विधिमंडळात जाण्याची नारायण राणे यांची इच्छा अखेर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी पूर्ण केली. दरम्यान संधीबद्दल पक्ष नेतृत्वाचा आभारी असल्याची प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.
कुडाळ आणि वांद्रे पूर्व विधानसभेच्या दोन मतदारसंघांतील लागोपाठ दोन पराभवांमुळे राणे यांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राणे यांच्या शीघ्रकोपी स्वभावामुळे पक्षातील नेत्यांची त्यांनी नाराजी ओढावून घेतली होती. देशात सर्वत्रच काँग्रेसची पिछेहाट होत असताना महाराष्ट्रासारख्या राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत राहावा या उद्देशानेच राणे यांना पक्षाने संधी दिली आहे. लागोपाठ दोन पराभवांनंतही विधान परिषदेची आमदारकी देण्यात आल्याने दिल्ली दरबारी राणे यांचे पक्षात महत्त्व कायम असल्याचा संदेश गेला आहे.
मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर राणे यांनी मागे राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावर आगपाखड केली होती. काँग्रेसमध्ये नेतृत्वाला आव्हान देण्याची भाषा करणे म्हणजे पक्षात कायमची फुल्ली मारली जाते. त्यातूनच अशोक चव्हाण यांच्यानंतर पक्षाने मुख्यमंत्रीपदाकरिता राणे यांचा विचार केला नव्हता. तसेच राणे यांच्याकडील महसूल खाते काढून घेण्यात आले. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राणे यांची बाजू उचलून धरली. राज्यातील सर्व नेते विरोधात असताना केवळ दिल्लीच्या आशीर्वादामुळे राणे यांचा मागील दाराने विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.