१२९ वर्षांच्या जुन्या काँग्रेस पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी झाली पाहिजे, असा सल्ला साडेनऊ वर्षांंपूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या नारायण राणे यांनी पत्राद्वारे राहुल गांधी यांना दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत राणे हे सुद्धा आहेत. या पाश्र्वभूमीवर जनाधार असलेल्यांना पक्षसंघटनेत स्थान द्यावे, अशी मागणी करीत आपल्या नावाचा या पदासाठी विचार व्हावा, असे राणे यांना बहुधा सुचवायचे असावे, असे काँग्रेस पक्षात म्हटले जाते. १२९ वर्षांंचा वारसा लाभलेल्या काँग्रेसने केंद्र आणि विविध राज्यांमधील सत्ता पुन्हा काबीज करण्याच्या उद्देशाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, यासाठी आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक कृती योजना तयार करावी, असा सल्ला राणे यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे. पक्षात चैतन्य आणण्यासाठी सोनिया गांधी व राहुल यांनी नियमितपणे सर्व राज्यांचा दौरा करण्याची मागणी राणे यांनी केली आहे.
उठसूठ तक्रार करणाऱ्यांना पक्षात महत्त्वाची पदे दिली जातात. अशा मंडळींमुळे प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यकर्ते बाजूला पडतात. अशा तक्रारदारांना दूर ठेवावे, अशी भावना राणे यांनी व्यक्त केली. पक्षाने नियुक्त केलेली व्यक्ती जनतेच्या अपेक्षांना उतरत नसेल तर त्यांना तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे.