महाराष्ट्राच्या राजकारणात रोखठोक स्वभाव आणि बेधडक राजकारण करणारा चेहरा अशीच ओळख असणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी  राजीनामा दिला.
कोकणवासियांच्या समस्यांना वाचा फोडणारा आणि बेधडक शैलीचा नेता म्हणून ओळखनिर्माण केलेल्या या कोकणपुत्राचा राजकीय प्रवासही तितकाच आडवळणाचा राहिला आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राणेंच्या राजकीय अस्तित्वाला नवे वळण मिळाले आहे आणि काँग्रेसची कोंडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

– याची सुरूवात झाली ती लोकसभा निवडणुकीतील ‘मोदी’ वादळापासून. राणे सुपुत्र निलेश राणे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मोदी वादळासोबतच आधी राष्ट्रवादीचे आणि आता शिवसेनेत प्रवेश केलेले दिपक केसरकरांच्या विरोधाचा फॅक्टरही ‘राणे’ पराभवाला कारणीभूत ठरल्याचे विश्लेषकांना वाटते.

– लोकसभा निवडणुकीचे राज्यात बिगुल वाजले तेव्हा कोकणातील धूमशानमुळे भुजबळांचीही कोंडी निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे दिपक केसरकर राणेंविरोधात प्रचार करत होते, तर राणेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्या गटाने उघडपणे भुजबळांविरोधात काम सुरू केले होते.

– लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणेंना पराभवाचा धक्का बसला आणि त्यांच्यासह राज्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वादळ निर्माण झाले.

– पक्षाच्या दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसच्या वतीने लढविण्यात आलेल्या सर्व २६ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला राणेंची अनुपस्थिती हीच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर राणे यांनी पुन्हा नाराजीचे सुर उमटण्याची सुरूवात ठरली. याआधी विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तेव्हाही राणे यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात थयथयाट केला होता. मधल्या काळात राणे शांत होते, पण आता पुन्हा त्यांनी उचल घेतली आणि राणेंनी काँग्रेसलाच आव्हान देणे सुरू केले.

– काँग्रेसमध्ये ‘स्वाभिमान’ मिळत नसलेल्या नारायण राणेंना बहुजन समाजात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे घट्ट करून महायुतीच्या माध्यमातून नव्या जातीय समीकरणाला आकार देणाऱया गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधन झाले आणि राणेंचा भाजप प्रवेशाचा ‘राजमार्ग’ बंद झाला.

– त्यांनतर खुद्द मुख्यमंत्र्यांकडून नाराज राणेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. भोजनाचे निमित्त करून चव्हाण व राणे यांच्यात बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर माणिकराव ठाकरे, चव्हाण व राणे यांच्यात काही वेळ खलबते झाली.

– लोकसभा निवडणुकीत मुलगा नीलेशचा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला आहे आणि त्यात ‘राणेनिष्ठ’ भाजपच्या संपर्कात! असल्याचीबाब राणेंना डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती.

– त्यात राणेंचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक शिवसेनेत दाखल झाले. नगरसेवक रविंद्र फाटक यांच्यासह काँग्रेसच्या अन्य सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्त्व बदलाच्या चर्चेला काँग्रेस हायकमांडकडून पूर्णविराम मिळाल्यानंतर आता नारायण राणे यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर उघडपणे टीका करणे सुरू केले. मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर फरक दाखविला असता असे स्पष्ट मत व्यक्त करीत राणेंनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

– दरम्यान, नारायण राणे राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला सुरूवात झाली परंतु, राणे मंत्रिपद अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत असे स्पष्टीकरण देऊन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला पण, खुद्द नारायण राणेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आणि कदम यांचा निष्ठावान विश्वास फोल ठरविला..

– राजीनामा देण्यापूर्वी नारायण राणेंनी शेलक्या शब्दांत ‘प्रहार’ करत शिवसेना नेतृत्वाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरेंमध्ये सरपंच होण्याचीही कुवत नसल्याचे वक्तव्य राणेंनी केले. इतकेच नाही, तर उद्धव यांच्याकडूनच बाळासाहेबांचा छळ झाल्याची जळजळीत टीका राणेंनी केली.