नाराजीची नेतृत्वाकडून दखल; भेटीबाबत समाधानी असल्याचा निर्वाळा

काँग्रेस पक्षात अस्वस्थ असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली. राहुल यांची भेट मिळाल्याने काँग्रेस पक्षाने राणे यांची नाराजीची गंभीर दखल घेतल्याचे मानले जाते.

राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली. राणे यांनी मात्र त्याचा इन्कार केला असला तरी काँग्रेसमध्ये ते सध्या फारसे समाधानी नाहीत. राणे यांचे पुत्र निलेश यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले होते. राणे यांच्या नाराजीची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणाऱ्या किंवा पक्ष सोडून जाण्याची चर्चा असलेल्या नेत्यांना राहुल गांधी शक्यतो भेट देत नाहीत. पण राणे यांना राहुल यांनी भेट देऊन त्यांना महत्त्व दिले आहे. राणे यांनी रात्री राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तासाच्या भेटीत राणे यांनी त्यांची बाजू मांडली. महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी कसे प्रयत्न करता येतील याबाबत राहुल गांधी यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर केल्याचे राणे यांनी सांगितले. पक्ष संघटनेतील फेरबदलात राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जावे, असा पक्षात मतप्रवाह आहे. राहुल यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबद्दल समाधानी असल्याचेही राणे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कार्यपद्धती, राज्यात पक्षात आलेली मरगळ याकडेही राणे यांनी लक्ष वेधल्याचे समजते.