उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर विधान परिषदेसाठी भाजपचाच उमेदवार

विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीवरून भाजप- शिवसेना युतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. राणेंना मंत्रिमंडळात घेणार नाही याची ठोस हमी नसेल, तर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत आमचा पाठिंबा गृहित धरू नका, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी भाजपा नेत्यांना सुनावले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने राणेंना सबुरीचा सल्ला दिला असून राणे यांनी तो मान्य केल्याने आता भाजपमधीलच एका इच्छुकाला संधी दिली जाणार असून त्यासाठी शिवसेना पाठिंबा देईल, असा दावा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र पक्ष काढताना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून राणे यांना पाठिंबा देण्याची तयारी भाजपने सुरू केली होती. मात्र राणे यांच्या केवळ मंत्रिपदालाच नव्हे तर आमदारकीलाही शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. राणेंच्या उमेदवारीवरून भाजप-शिवसेनेतील दरी वाढत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही राणे यांच्याविरोधात शिवसेनेशी हातमिळवणी सुरू केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा  पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सद्यस्थितीत शिवसेनेशी थेट संघर्ष करण्याऐवजी राणे यांनाच काही काळ शांत राहण्यास सांगावे आणि पुढील काळात राणे यांना विधान परिषदेत निवडून आणावे, असा निर्णय झाला होता. त्यानुसार फडणवीस आणि पाटील यांनी राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणे यांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राणे ही निवडणूक लढविणार नसून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती पाटील यांनी ठाकरे यांना केल्याचे समजते. मात्र राणेना मंत्रिमंडळात वा विधान परिषदेत घेण्यास आमचा तीव्र विरोध असून त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाही आणि पुढेही आमदारकीसाठी मदत करणार नाही ,अशी हमी दिल्याखेरीज आमचा पाठिंबा गृहीत धरू नका, असे ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे समजते. राणे यांनी शिवसेनेलाच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शिव्या दिल्या असून हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असेही ठाकरे यांनी पाटील यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घातल्यानंतर, पक्षातीलच इच्छुकांपैकी एकास उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

भंडारींसह १२ जण इच्छुक

पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, शायना एन.सी, प्रसाद लाड, प्रमोद जठार यांच्यासह तब्बल १२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यातील कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय रात्री होईल. शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी येत्या दोन दिवसात त्यांचा पाठिंबा मिळेल, असा दावाही भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने केला.

‘राणे उभे राहिले तर विरोधक एकत्र येतील’

नारायण राणे विधान परिषदेसाठी उभे राहिले किंवा त्यांच्या पक्षाला भाजपने पाठिंबा दिला तर त्यांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येतील, असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. संघर्ष यात्रेच्यानिमित्ताने आम्ही एकत्र आलोच होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.