लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवापासून नाराज असलेले उद्योगमंत्री नारायण राणे येत्या सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राणे राजीनामा देणार असल्याचा विषय राज्याच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी दुपारपासून वेगाने फिरू लागला आहे. राणे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असले, तरी ते कॉंग्रेसला रामराम ठोकणार नसल्याचे समजते. मात्र, या वृत्ताला राणे यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीत अधिकाऱयांशी बोलताना सोमवारनंतर आपण मंत्रिपदावर राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य राणे यांनी केल्याचे सूत्रांकडून कळते. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून राणे राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या काही बैठकांना राणे अनुपस्थित होते. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीलाही जाऊन आले होते. या सर्व पार्श्वभूमीवरच ते राजीनामा देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.