News Flash

राणेंच्या सचिवाला विद्यापीठाचा वेगळा न्याय?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खासगी सचिव अमोल गवळी यांना काही तासांतच निकाल मिळाला.

(संग्रहित छायाचित्र)

काही तासांत पुनर्मूल्यांकनाच्या निकालाने शंका

मुंबई : पुनर्मूल्यांकनाचा निकाल मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अनेक महिने वाट पाहावी लागते. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खासगी सचिव अमोल गवळी यांना काही तासांतच निकाल मिळाला. पुनर्मूल्यांकनाच्या या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेबाबत याआधीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उंबरठे झिजवावे लागत असताना नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांना मात्र परीक्षा विभागाकडून विशेष वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खासगी सचिव अमोल गवळी हे विद्यापीठात विधि पदव्युत्तर (एलएलएम) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. ‘एलएलएम’च्या पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये झाली आणि त्याचा निकाल २६ मार्च रोजी जाहीर झाला. या निकालामध्ये गवळी यांना एका विषयात १० गुण मिळाले होते. या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी गवळी यांनी अर्ज केला. ‘एलएलएम’ प्रथम सत्राच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनानंतर अर्ज करण्यासाठी १ ते ८ एप्रिलपर्यंत मुदत होती. गवळी यांना पुनर्मूल्यांकनाचा निकाल १ एप्रिलला मिळाला आहे. पुनर्मूल्यांकनानंतर त्यांचे गुण वाढून ४८ झाले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठाला दिले आहे.

विद्यापीठाने मात्र झालेला प्रकार नियमानुसारच असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील उपकुलसचिव आणि जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांला शून्य गुण असले तरीही विद्यार्थ्यांचे अर्ज आम्ही घेतो. दोन वर्षांपूर्वी कुलगुरूंनी असे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांने दोन विषयांसाठी अर्ज केला होता. त्यातील एकाच विषयात तो उत्तीर्ण झाला आहे. पहिल्या दिवशी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना लगेच निकाल मिळू शकतात. इतरही विद्यार्थ्यांना असे निकाल मिळाले आहेत.’

आमच्यासाठी नियम वेगळा का?

आमचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल मिळण्यासाठी अनेक आठवडे लागतात. त्याचप्रमाणे ‘एलएलएम’साठी किमान १८ गुण नसतील तर विद्यार्थ्यांचे अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी स्वीकारले जात नाहीत. मात्र, गवळी यांचा अर्ज विद्यापीठाने कसा स्वीकारला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

मी दोन विषय पुनर्मूल्यांकनासाठी दिले होते. त्यातील एकाच विषयाचा निकाल मिळाला. त्या उत्तरपत्रिकेची पुरवणीही विद्यापीठाकडून गहाळ झाली आहे. मी कुणाकडे नोकरी करतो, याचा इथे काहीही संबंध नाही. या प्रक्रियेत गैरप्रकार किंवा दबाव असता तर एकाच विषयाचा निकाल का मिळाला असता? मराठी माध्यमातून उत्तरपत्रिका लिहिणारे विद्यार्थी मोजकेच असतात. त्यामुळे निकाल लवकर मिळू शकतो.

 अमोल गवळी

अर्ज केल्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांला निकाल मिळणे संशयास्पद आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. याबाबत विद्यापीठालाही निवेदन दिले आहे.

– अ‍ॅड. संदीप केदारे, विद्यार्थी प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 2:46 am

Web Title: narayan rane private secretary amol gawli get immediately re evaluation results
Next Stories
1 रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक
2 ‘जेट’ जमिनीवर आल्याने पर्यटकांच्या सहलयोजना अधांतरी!
3 मोदी यांनी करकरेंच्या घरी धाव घेतली होती..
Just Now!
X