‘आपल्या क्षमतेचा पक्षात पुरेपूर वापर करून घेतला जात नाही, योग्य निर्णयच होत नाही,’  असे उद्गार काढणाऱ्या नारायण राणे यांचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागा झाला आहे. काँग्रेसमधील नऊ वर्षांच्या वाटचालीतही पदरी काहीच न पडल्याने उद्विग्न झालेले राणे यांनी सोमवारी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा गुरुवारी केली. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या भवितव्याचे चित्रही फारसे आशावादी नसल्याने राणे काँग्रेसलाही रामराम करण्याची चिन्हे आहेत. अर्थात राजीनाम्यासाठी राणे यांनी पाच दिवसांनंतरचा मुहूर्त जाहीर केल्याने ते खरेच जाणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी राणे यांनी लावून धरली होती. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत यश मिळणार नाही, असे त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनाही सांगितले. मात्र पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांना अभय दिल्याने राणे संतप्त झाले. चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राहण्यापेक्षा बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून, त्यादिवशीच भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल पत्ते खुले करणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.  काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा त्यांनी केला असला तरी राणे काँग्रेसमध्ये राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
वाटचाल कोणत्या दिशेने ?
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर राणे साधे आमदार म्हणून काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. राजीनाम्यानंतर काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवून कारवाई व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असू शकतो. काँग्रेसमधून बाहेर पडल्यास राणे यांचे राजकीय भवितव्य कसे असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मध्यंतरी होती. राणे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपच्या प्रदेश नेत्यांनी राणे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. मात्र, भाजपच्या गोटात सध्या स्वबळाचे वारे घोंघावत आहेत. शिवसेनेला दूर ठेवीत भाजपने स्वबळाचा प्रयोग केल्यास राणे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतात. नितीन गडकरी यांच्याबरोबर आपली भेट झाल्याच्या वृत्ताचा राणे यांनी इन्कार केला. मात्र राणे यांच्यासाठी एका बडय़ा उद्योगपतीने भाजपकडे शब्द टाकल्याची चर्चा आहे.  राणे यांच्यासाठी शिवसेनेची दारे कायमची बंद झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय राणे यांना फायदेशीर ठरणारा नाही. अजित पवार यांचे पक्षातील वाढते प्रस्थ लक्षात घेता राणे यांना महत्त्व मिळणार नाही. राणे ‘स्वाभिमान’च्या माध्यमातून स्वत:ची ताकद आजमवू शकतात, असा एक मतप्रवाह आहे. मात्र स्वत:च्या ताकदीवर लढणे राणे यांच्यासाठी मोठे आव्हान असेल.
राणे आणि राजीनामा..
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर ऑगस्ट २००५ मध्ये राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण पक्ष प्रवेशापासून ते आजपर्यंत ते काँग्रेसमध्ये रमलेच नाहीत. राणे यांना काँग्रेस संस्कृती समजलीच नाही, असा अर्थ काढला जातो. पक्षप्रवेश करताना आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, पण ते पाळण्यात आले नाही, असा राणे यांचा आक्षेप आहे. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर राणे यांनी थयथयाट केला होता. राहुल गांधी, अहमद पटेल या नेत्यांवर आरोप केले होते. त्यातून राणे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. नंतर पक्षात घेऊन मंत्रिपद देण्यात आले. नवी मुंबईत व्हिडिओकॉनला जमीन देण्याविरोधातही सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नेतृत्व बदलाच्या अपेक्षेने त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. पृथ्वीराज चव्हाण यांना अभय दिल्याने ते संतप्त झाले आहेत.

“बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना सेना कदापिही थारा देणार नाही. त्याचप्रमाणे एकमेकांना त्रास देणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश न देण्याच्या सेना-भाजपमधील सामंजस्य करारानुसार  राणे यांना भाजपमध्येही प्रवेश दिला जाणार नाही.”
-उद्धव ठाकरे