नारायण राणे विधानसभेपर्यंत पोहोचू नये, यासाठी स्वपक्षीयांनीच कारस्थान रचल्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रसचे काही नेते केवळ चेहरा दाखवण्यापुरते समोर होते, असा आरोप  राणे यांच्या मालकीच्या ‘प्रहार’ या वृत्तपत्रातील अग्रलेखातून करण्यात आला आहे. वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बुधवारी प्रतिक्रिया देताना संपूर्ण काँग्रेस पक्षाने मला निवडणुकीत साथ दिल्याचे राणे यांनी म्हटले होते. मात्र, काही तासांतच राणे यांनी वृत्तपत्रातील अग्रलेखाच्या माध्यमातून एकप्रकारे स्वपक्षीयांविषयीच्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. नारायण राणे यांचा पराभव करणे, हे केवळ शिवसेना-भाजपाचेच काम नव्हते तर स्वपक्षातली अनेक मंडळी राणे विधानसभेपर्यंत पोहोचू नयेत, अशा कारस्थानात निश्चितपणे असली पाहिजेत. भाजपा-सेनेला हे वाटणे अगदी स्वाभाविक आहे की, राणे यांच्यासारखा आक्रमक आणि खंदा आमदार विधानसभेत समोर उभा राहिला की, सरकारची फटफजिती होणार आहे. त्यामुळे नारायण राणे निवडून येता कामा नयेत, हे सेना-भाजपाला वाटणे अगदी स्वाभाविक मानले पाहिजे. पण, काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना तीच धास्ती होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अनेक नेते चेहरा दाखवण्यापुरते समोर होते. काही दाखवण्यापुरतेही नव्हते. जे समोर होते ते शरीराने बरोबर होते आणि मनाने काही वेगळेच योजत होते. त्यामुळे दिसायला काँग्रेस पक्ष प्रचारफेरीच्या जीपमध्ये एकत्र? दिसला तरी व्यवहारात काम करताना किंवा काळोख पडल्यानंतर तो एक नव्हता आणि काळोख पडल्यानंतरही अनेकांनी अनेक उद्योग केले; पण नारायण राणे लढले आणि पक्ष हरला, अशी त्यामुळे स्थिती झाली, असे या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.