परस्परांवर टोकाची टीका करूनही शिवसेना आणि भाजपात अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. युतीच्या निर्णयावर खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. भाजपा-शिवसेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या बचावासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. युती सडली होती असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते. मग ते पुन्हा एकत्र का आले. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. युतीला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. तसेच शिवसेनेच्या पराभवासाठी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष प्रयत्न करेन असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा..उद्धव ठाकरे म्हणजे दिलेला शब्द न पाळणारा माणूस: नारायण राणे

नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही. युती झाली तरी त्यांची मने जुळलेली नाहीत. शिवसेना स्वबळावर लढणार होती. त्याचे काय झाले ? ज्यांनी लढण्याची तयारी केली होती. ऐनवेळी त्यांनी काय करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मागील साडेचार वर्षांतील शिवसेनेची भाजपाबरोबरची वर्तणूक भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे ही युती एक औपचारिकता आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. काल पत्रकार परिषदेत कुठेच उत्साह दिसून आला नाही. तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना या पलीकडे काही नाही.

देशात सर्वाधिक भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. हा भ्रष्टाचार पचवण्यासाठी सत्ता पाहिजे म्हणून त्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. ही युती नेत्यांच्या समाधानासाठी आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.