काँग्रेस पक्ष माझा सेवादल करण्याच्या बेतात आहे, पण मी तसे होऊ देणार नाही, असा ‘आवाज’ देत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात सेवादलाच्या कार्यक्रमातच थेट पक्ष नेतृत्वालाच इशारा दिला. कार्यकर्ता माझ्याप्रमाणे धगधगत्या निखाऱ्यासारखा हवा, असे सांगताच ‘तो कधी खुर्चीवरून हटतो आणि मी कधी बसतो’ ही काँग्रेस प्रवृत्ती बदलली पाहिजे, असा घरचा आहेरही राणे यांनी या वेळी दिला. राज्यात वर्षांनुवर्षे काँग्रेसचा सेवादल विभाग कार्यरत आहे. तरीही काँग्रेसची स्थिती अशी का, याचाही विचार करा, असे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांने आपल्या पक्षाच्या चुकीच्या धोरणांची चर्चा करत बसण्यापेक्षा आधी शिवसेना-भाजप किंवा मनसेवर टीका करावी आणि कोणीही सापडले नाही तर राष्ट्रवादीवर टीका केली तरी चालेल, असा सल्ला देण्यासही राणे या वेळी विसरले नाहीत.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये महाराष्ट्र प्रदेश सेवादलच्या वतीने कोकण विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी सेवादलचे प्रदेश प्रभारी श्योराज वाल्मिकी, प्रदेश संघटक बनवारी शर्मा, संघटनमंत्री राजेश जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत पक्ष श्रेष्ठींना लक्ष्य केल्याने उपस्थित कार्यकर्तेही अवाक् झाले.
सेवादलात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची पदांवरही वर्णी लागली पाहिजे. राज्यात वर्षांनुवर्षे सेवादल कार्यरत आहे, तरीही पक्षाची स्थिती सुधारत नाही. सेवादलाच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळावी, यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
भाजप म्हणजे भाजीपाला असून त्यांच्याकडे काहीच कार्यक्रम नाही. भाजपमध्ये नुसतीच जाहिरातबाजी होते. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेसाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा पैसा आणला कुठून आणि कसा, याचे उत्तर आधी या पक्षाच्या नेत्यांनी द्यावे. हा पैसा देवळातून आणला की अयोध्येतून, असा सवालही त्यांनी केला.
टोलनाका युतीच्या काळात आला, तेव्हा विरोध नव्हता. तेव्हा चालत होते. मग, आता काय झाले. राज्यातील सर्वच प्रश्न काँग्रेसने संपविले. टोलनाक्याचा प्रश्न आता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे टोलनाक्याच्या मुद्दय़ावर रास्ता रोको आंदोलन करावे लागत आहे, असे सांगत राणे यांनी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे.

तेव्हाच्या भ्रष्टाचाराची कबुली?
भाजपने भ्रष्टाचारावर बोलू नये, त्यांच्या रक्तातच भ्रष्टाचार आहे, असा टोला त्यांना लगावला. त्याबरोबरच, मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री होते. त्यामुळे कोणीही धुतल्या तांदळासारखा नाही, असा आरोपही करीत आपण एक प्रकारे आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील भ्रष्ट कारभाराची कबुलीच देत आहोत, याचे भानही राणे यांना राहिले नाही.