ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांचे काही निष्ठावान कार्यकर्ते व कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असून शिवसेनेची कोकणातील शक्तिस्थळे खिळखिळी करण्यासाठी त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा घाट भाजपमध्ये शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. राणे यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यास ती शिवसेनेला डोकेदुखी ठरणार आहे.
भाजपमध्ये प्रवेशाचा प्रस्ताव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिवसेनेकडे गेल्याने त्याविरुद्ध राजकीय व्यूहरचना करण्यात येणार आहे. मात्र नारायण राणे यांच्या भाजप-प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले.
 राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर ‘प्रहार’ केले आहेत. भाजपने राणे यांना प्रवेश देऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पण त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपने प्रवेश दिला आणि त्यांनी शिवसेनेविरोधात कारवाया केल्या, तर शिवसेनेला त्रास होणार आहे. भाजपने स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला, तर राणे यांच्या कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ातील काही भागात उपयोग होऊ शकतो. ज्यांच्याविरोधात कोणतेही आरोप नाहीत किंवा पोलीस तक्रारी नाहीत, अशांचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो.
 भुजबळ यांना प्रवेश देणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले असले तरी त्यांच्या विश्वासातील नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश सुरू आहे.
राणे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद असले तरी त्यांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असून पुढील काही दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे समजते.राणे यांनाही शिवसेनेला त्रास द्यायचा असल्याने आणि भाजपला कुरघोडी करावयाची असल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ात वेगळी राजकीय व्यूहरचना करण्यात येत आहे.