काँग्रेस सोडल्यास अन्य पर्यायच उपलब्ध नसणे, स्वतंत्र पक्ष स्थापून हाती काहीच लागण्याची शक्यता नसणे तसेच पुत्र नितेश यांना उमेदवारी देण्याची पक्षश्रेष्ठींकडून मिळालेली हमी, यामुळेच काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेणारे नारायण राणे यांनी सपशेल माघार घेतली आणि मंत्रिपदी कायम राहणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले.

भविष्यातील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगत राणे यांनी दोन आठवडय़ांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राणे काँगेसला रामराम करणार अशीच चिन्हे होती. राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजप नेतृत्वाने मात्र राणे यांना तेवढा प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेची दारे कायमची बंदच आहेत. राष्ट्रवादीमध्ये राणे टिकणे शक्यच नव्हते. ‘स्वाभिमान’ संघटनेच्या माध्यमातून राजकारण करणे तेवढे सोपे नाही, याचाही अंदाज राणे यांना आला होता. स्वाभिमान आणि मनसे एकत्र येऊन शिवसेनेची कोंडी करतील, अशीही चर्चा होती. पण राज ठाकरे आणि राणे यांचा स्वभाव लक्षात घेता दोघांचे पटणे कठीणच होते. अन्य कोणताही पर्यायच शिल्लक नसल्याने शेवटी राणे यांनी काँग्रेसमध्येच राहण्यावर भर दिला.
पुत्र नितेश आणि स्वत:ला उमेदवारी मिळावी, अशी राणे यांची इच्छा होती. यानुसार दोघांनाही उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. नितेश यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मिळाल्याचे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यानुसार राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात नितेश हे लढतील तर स्वत: राणे कणकवलीतून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हाती काय लागले, ते शोधतो आहे
काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या आश्वासनांमुळे काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे राणे यांनी सांगितले. त्यावर ‘या सगळय़ा प्रकरणात तुमच्या हाती काय लागले’ असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, तेव्हा ‘हाती काय लागले, हे मीही शोधतो आहे,’ असे सूचक उत्तर राणे यांनी दिले.